
तासगाव शहरातील गणपती मंदिरासमोर आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सांगलीहून विटाकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने रस्ता ओलांडणाऱ्या दीपक वसंत हिंगमिरे (वय ५५, रा. सूर्यवंशी गल्ली, गुरुवार पेठ, तासगाव) यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते एसटीच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगमिरे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी गणपती मंदिरात दर्शन घेण्यासाठी मंदिरात आले होते. दर्शन घेऊन मंदिरासमोरील दूध डेअरीतून दूध घेऊन ते घरी परतत होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना सांगलीहून विटाच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसने त्यांना समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ते थेट बसच्या चाकाखाली सापडले.
अपघात घडताच परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. काही जणांनी तत्काळ मदतीला धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हिंगमिरे यांना बाहेर काढले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व एसटी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी हिंगमिरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच हिंगमिरे हे एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले होते. ऊस त्यांच्या अंगावर पडूनही ते सुदैवाने वाचले होते. मात्र, आजच्या या दुर्दैवी घटनेत नियतीने पुन्हा घाला घालत त्यांचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातामुळे गणपती मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतुकीची कोंडीही झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.