
Teacher aggressive TET exam in demands reconsideration on petition Nanded News update
TET Exam : परभणी : टीईटी निर्णयाच्या पुनर्विचार याचिकेची तातडीने दाखल करण्याची मागणी, तसेच विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय महासंघाच्या वतीने शुक्रवारी (दि.५) जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेपासून दुपारी तीनच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मैदानावर झाला.
यावेळी प्रा. किरण सोनटक्के यांनी, शासनाने शिक्षकांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे असे सांगितले. त्यानंतर शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आलेले निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. निवेदनावर अमृत देशमुख, प्रभाकर शिरसाट, राजू शिंदे, रवी लोहट, नारायण जाधव आर्दीच्या स्वाक्षऱ्या आहेत. या महामोर्चात जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
हे देखील वाचा : महिला खासदारांनी धरला ठेका! खासदार सुप्रिया सुळे, कंगना राणौत अन् महुआ मोईत्रा यांचा Dance Video Viral
यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी, म.ना.से. नियम १९८२ व १९८४ अंतर्गत जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी, तसेच टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ लावून विविध कार्यालयांकडून सुरू असलेली दडपशाही तत्काळ थांबवावी, अशी मागणी केली. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, १५ मार्च २०२४ चा संचमान्यता विषयक शासन निर्णय मागे घ्यावा, १०, २० आणि ३० वर्षांनंतरची सुधारित तीन वेतनलाभांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी.
शिक्षकेतर कर्मचार्यांची बंद असलेली पदभरती त्वरित सुरू करावी, विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतनश्रेणी मंजूर करावी, अशैक्षणिक व अनावश्यक ऑनलाईन उपक्रम थांबवावेत, वस्तीशाळेतील शिक्षकांना मूळ नियुक्ती तारखेपासून सर्व सेवा लाभ द्यावेत, आश्रमशाळांमधील कंत्राटी भरतीचे धोरण रद्द करावे, तसेच कमी पटाच्या शाळा बंद न करता नियमित शिक्षणक्रम सुरू ठेवावा, अशा महत्त्वाच्या मागण्याही निवेदनात करण्यात आल्या.
हे देखील वाचा : महायुतीतील घटक पक्षांचे आता पुन्हा ‘जुळणार’; पक्ष बदलावर नागपुरात निघणार ‘हा’ तोडगा
विविध संघटनांचा सक्रिय सहभाग
या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, प्राथमिक शिक्षक परिषद, जुनी पेन्शन संघटना, मराठवाडा शिक्षक संघ, मुख्याध्यापक शिक्षक संघ, संघशवती महिला आघाडी, राष्ट्रवादी शिक्षक संघ, शारीरिक शिक्षक महासंघ, राष्ट्रवादी आश्रमशाळा शिक्षक संघ, शिक्षक भारती आदी संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविला.