Thane News: पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दारात काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील वाढत्या अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ठाणे शहर जिल्हा काँग्रेसने शिक्षण विभागाच्या दारात तीव्र आणि लक्षवेधी निषेध आंदोलन छेडले. या आंदोलनाने शहराच्या शैक्षणिक व्यवस्थेतील असंतोषाला वाचा फोडली.
काँग्रेसने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर, गुरुवारी प्रत्यक्ष ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर नौपाडा, विष्णुनगर येथे हे आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, भालचंद्र महाडिक, जे. बी. यादव, रविंद कोळी, स्मिता वैती, महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, जयेश परमार, जावेद शेख यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या वेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी करत महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. शालेय शिक्षण व्यवस्थेतील ढासळलेली गुणवत्ता, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा न मिळणे, शिक्षकांची रिक्त पदे आणि अन्य अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या सगळ्या मागण्या निवेदनाद्वारे ठामपा शिक्षण विभागाच्या उपायुक्तांकडे सादर करण्यात आल्या. काँग्रेसने प्रशासनाला इशारा दिला की, मागण्या न मानल्यास पुढील टप्प्यात पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे शहरात शिक्षण व्यवस्था सुधारण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.