'त्यांच्या डोक्यातील ब्रेन चिप चोरी झालीय'; मत चोरीच्या आरोपांवरून CM फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीत मतदान चोरी केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आज पुरावे देखील सादर केले. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानात फेरफार झाल्याच्या आरोपांचं खंडण करत त्यांनी एक तर राहुल गांधी यांचा मेंदू चोरीला गेला आहे नाहीत त्यांची ब्रेन चिप चोरी झाली असेल, असा टोला लगावला आहे.
७ ऑगस्ट २०२५ रोजी गोव्यातील पणजी येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींचे आरोप सरळ फेटाळून लावले. राहुल गांधी प्रत्येक वेळी निराधार आणि वैयक्तिक हल्ले करतात. मला वाटते की त्यांनी त्यांचा मेंदू तपासला पाहिजे. एकतर त्यांचा मेंदू चोरीला गेला आहे, किंवा त्यातील चिप गहाळ आहे. त्यांचे आरोप हास्यास्पद आहेत.
ते पुढे म्हणाले, ‘सायंकाळी ५:३० नंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याची चर्चा खोटी आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी पुष्टी केली की असे कोणतेही मतदान झालेलं नाही. या सर्व डेटामध्ये फेरफार करण्यासाठी केले गेले. राहुल गांधी यांनी कर्नाटकात मतदार यादीत हेराफेरीचा आरोपही केला, ज्यामध्ये १,००,००० बनावट मते, ११,९६५ डुप्लिकेट नोंदी, ४०,००९ अवैध पत्ते आणि फॉर्म ६ च्या गैरवापराचे ३३,६९२ प्रकरणे उघड झाली. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला आव्हान देत म्हटले की, ‘हा त्यांचा स्वतःचा डेटा आहे, आम्ही फक्त तो बाहेर काढत आहोत. माझे विधान माझे प्रतिज्ञापत्र आहे.’
कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) राहुल गांधींचे दावे फेटाळून लावले आणि त्यांना ‘बनावट मतदारांची’ नावे असलेले स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. अशा गंभीर आरोपांना ठोस पुरावे आवश्यक आहेत. पुराव्याशिवाय, तो केवळ प्रचार ठरू शकतो, असं त्यांनी म्हटटं आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने २८८ पैकी २३० जागा जिंकून चमकदार कामगिरी केली. भाजपला १३२ जागा, शिवसेना (शिंदे गट) ५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (एमव्हीए) चा दारूण पराभव झाला. काँग्रेसला फक्त १६ जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी (सपा) १० आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) २० जागा मिळाल्या.
राहुल गांधींच्या “निवडणूक चोरी” च्या दाव्यांमुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. फडणवीस आणि शिंदे यांनी याला निराशा आणि खोटा प्रचार म्हटले आहे, तर राहुल निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राहुल त्यांच्या दाव्यांसाठी ठोस पुरावे सादर करू शकतील का? निवडणूक आयोग या प्रकरणात काही कारवाई करेल का? ही राजकीय लढाई आता न्यायालय आणि जनतेच्या दरबारात पोहोचली आहे.