
Thane Unauthorized Stalls : ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगरसेविका आक्रमक; अनधिकृत टपऱ्या, रिक्षा आणि बेवारस वाहनांवर कारवाई
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील अनधिकृत टपऱ्या, बेकायदेशीर वाहनतळ, बंद अवस्थेतील बेवारस वाहने आणि अनधिकृत रिक्षा थांब्यांवर (Thane Unauthorized Stalls) तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिस विभागाला निवेदन दिले आहे.
प्रभाग क्रमांक 22 मधील खारटन रोड, चेंदणी कोळीवाडा आणि बाजारपेठ परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे वाघ यांनी निवेदनात म्हटले आहे. या परिसरातून ठाणे परिवहन सेवा (TMT), नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा तसेच भिवंडी, कशेळी आणि काल्हेरकडे जाणाऱ्या रिक्षा व टॅक्सींची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. विशेषतः सायंकाळच्या वेळेत या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
भिवंडी, कशेळी आणि काल्हेर मार्गावर धावणारे रिक्षा व टॅक्सीचालक मनमानी पद्धतीने वाहने उभी करत असल्याचा आरोप उषा वाघ यांनी केला आहे. चेंदणी कोळीवाडा परिसरात जेमतेम दोन रिक्षा उभ्या राहतील एवढी जागा असतानाही चालकांकडून तिसरी रांग तयार केली जाते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या प्रकारांवर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे सतत वाजणारे हॉर्न आणि वाहनांतून निघणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. यामुळे ध्वनी आणि वायुप्रदूषणात वाढ होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः अस्थमा आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांना या परिस्थितीचा अधिक त्रास होऊ शकतो, अशी चिंता वाघ यांनी व्यक्त केली.
दिवाळीच्या काळात बाजारपेठ आणि परिसरात नागरिकांची गर्दी वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करावी. अनधिकृत टपऱ्या हटवाव्यात, बेवारस व बंद अवस्थेतील वाहने उचलावीत तसेच बेकायदेशीर रिक्षा थांब्यांवर कारवाई करून वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी केली आहे.
या निवेदनाची प्रत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, आमदार संजय केळकर, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षा मीनल संख्ये आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनाही देण्यात आल्याचे वाघ यांनी सांगितले.
Ans: ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील खारटन रोड, चेंदणी कोळीवाडा आणि बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडीची समस्या आहे.
Ans: नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
Ans: अनधिकृत टपऱ्या, बेकायदेशीर वाहनतळ, बंद अवस्थेतील बेवारस वाहने आणि अनधिकृत रिक्षा थांब्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.