
फोटो सौजन्य- istock
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सफाईचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या वेतनातून ठेकेदार मे. ए. एम. रामचंदानी यांच्याकडून कथितरीत्या बेकायदेशीर कपात केली जात होती. तसेच कामगारांना वार्षिक भरपगारी रजा व रजेचे वेतनही दिले जात नसल्याची बाब समोर आली होती. याप्रकरणी श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी कामगारांच्या थकीत किमान वेतनातील फरक व भरपगारी रजेच्या वेतनाची गणना करून कामगारांच्या वतीने ठाणे कामगार उपआयुक्त कार्यालयात किमान वेतन अधिनियम, १९४८ च्या कलम २० (२) अंतर्गत वसुली दावा क्रमांक ०२/२०२५ दाखल केला होता. या दाव्यावर किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत प्राधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त चेतन जगताप यांनी ४ मे २०२६ रोजी आदेश पारित केला.
या आदेशानुसार, ठेकेदार मे. ए. एम. रामवंदानी यांनी १५ अर्जदार कामगारांना किमान वेतनातील फरकापोटी ३ लाख ७८ हजार ३५६ रुपये आणि नुकसानभरपाई म्हणून त्याच रकमेइतकी, म्हणजेच आणखी ३ लाख ७८ हजार ३५६ रुपये, अशी एकूण ७ लाख ५६ हजार ७१२ रुपये रक्कम आदेशाच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
तसेच ठेकेदाराने निर्धारित मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास मूळ मालक म्हणून ठाणे महानगरपालिका प्रशासनाने पुढील ६० दिवसांच्या आत संबंधित कामगारांना ही रक्कम अदा करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले होते.
श्रमिक जनता सघ युनियनने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ठाणे महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगार कायद्याच्या कलम २१ (४) अन्वये आपल्या जबाबदारीचे पालन करत २७ ऑक्टोबर रोजी संबंधित १५ सफाई कामगारांच्या बँक खात्यात एकूण ७ लाख ५६ हजार ७१२ रुपये जमा केले. प्रत्येक कामगाराला थकबाकीपोटी ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे. कामगारांची थकीत रक्कम अदा केल्याबद्दल श्रमिक जनता संघाच्या वतीने चिटणीस सुनील दिवेकर यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: ठाणे महापालिकेच्या हद्दीत काम करणाऱ्या १५ कंत्राटी सफाई कामगारांना थकीत वेतन आणि नुकसानभरपाई मिळाली
Ans: श्रमिक जनता संघ युनियनने कामगारांच्या थकीत वेतनासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
Ans: महापालिका प्रशासनाने २७ ऑक्टोबर रोजी संबंधित १५ कामगारांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली.