
Thane Marathon : ठाण्यात 1 नोव्हेंबरला ‘यंग इंडिया’ राज्यस्तरीय मॅरेथॉन
ऍथलिड्सतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने रविवार, 1 नोव्हेंबर रोजी ‘यंग इंडिया’ राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे (Thane Marathon) आयोजन करण्यात आले आहे. हिरानंदानी मेडोज सर्कल येथे होणाऱ्या या स्पर्धेत विविध वयोगटांतील धावपटूंना सहभागी होता येणार असून, विजेत्यांना सुमारे 10 लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटांसाठी 21 किलोमीटर अंतराची अर्ध मॅरेथॉन, तसेच पुरुष आणि महिला गटांसाठी 10 किलोमीटर अंतराची शर्यत आयोजित करण्यात आली आहे. 19 वर्षांखालील मुला-मुलींसाठी 10 किलोमीटर, 15 वर्षांखालील मुला-मुलींसाठी 5 किलोमीटर आणि 12 वर्षांखालील मुला-मुलींसाठी 3 किलोमीटर अंतराची शर्यत होणार आहे. याशिवाय 50 वर्षांवरील ज्येष्ठ पुरुष आणि महिलांसाठीही 3 किलोमीटर अंतराची शर्यत असेल.
या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे ठाणे जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात येणारी एक किलोमीटरची ‘फॅमिली रन’. या शर्यतीत 10 वर्षांखालील मुलांसोबत त्यांचे आई-वडील सहभागी होऊ शकतील. कुटुंबासह धावण्याचा आनंद घेण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ प्रशिक्षक दत्ता चव्हाण म्हणाले की, आगामी मोठ्या मॅरेथॉन स्पर्धांसाठी तयारी करणाऱ्या राज्यातील धावपटूंना या स्पर्धेच्या माध्यमातून आपली क्षमता तपासण्याची संधी मिळेल. स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या दहा क्रमांकांच्या विजेत्यांना रोख बक्षीस, गौरवपदक आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 21 किलोमीटरच्या शर्यतीतील पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
Table Tennis: सुयोग पाटीलची जिद्द अन् दमदार खेळ! पिछाडीवरून मुसंडी मारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार यंदापासून 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीचा स्पर्धेत समावेश करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला टी-शर्ट, सहभाग प्रमाणपत्र आणि पदक दिले जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या उपनेत्या अनिता बिर्जे यांनी दिली.
या स्पर्धेत सर्वाधिक सहभाग नोंदवणाऱ्या पहिल्या तीन शाळांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका शुक्रवार, 30 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी स्वप्नील चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागप्रमुख अमित जैस्वाल यांनी केले आहे.
ICC Ranking : कर्णधार झाली अन् अपयशाची मालिका सुरू झाली, स्मृतीने गमावले वनडेतील अव्वल स्थान!