
फोटो सौजन्य- istock
निवासी परिसरातील काही नागरिक आणि व्यावसायिक केडीएमसीच्या घंटागाडीत कचरा न टाकता रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे कचरा टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही ठरावीक ठिकाणी कचरा टाकण्याचे स्पॉट तयार झाले असून, तेथे कचरा जमा झाल्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून त्याला आग लावली जात असल्याचे सांगण्यात येते. प्लास्टिक, थर्माकोल आणि रबर जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर परिसरात पसरत असून, आधीच औद्योगिक प्रदूषणाचा सामना करणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सर्व्हिस रोडवरील आरएम-२३ समोर, ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या हॉलजवळ, श्री गणराज बैंक्वेट हॉल, आयडीबीआय बँकेसमोर तसेच श्री रोहिडेश्वर दर्शन सोसायटी (आरएच-८५) ते डीएनएस बैंक, सोनारपाडा मुख्य कार्यालयापर्यंतच्या परिसरात कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या रस्त्यावर सतत वाहतूक सुरू असते. तसेच उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखालील मोकळ्या भूखंडांवर काही नागरिक आणि व्यावसायिक वाहनांमधून कचरा आणून टाकत असल्याची माहिती मिळत आहे. काही व्यक्ती रिक्षा आणि टेम्पोमधून कचरा आणून येथे फेकत असल्याचेही सांगण्यात येते.
याच सर्व्हिस रोडवर उभारण्यात आलेले वंदेमातरम् उद्यान आणि शैलगंगा मिलापनगर शहरी वन प्रकल्प यांच्या परिसरात स्वच्छता राखली जात असल्याचे उदाहरण नागरिकांकडून दिले जाते. पेट्रोलियम व गॅस पाइपलाइन, वीजवाहिन्या, सततची वाहतूक आणि जवळचा रहिवासी परिसर या बाबी लक्षात घेता हा भाग संवेदनशील बनला आहे. त्यामुळे कचरा टाकण्यास प्रतिबंध, नियमित स्वच्छता, सीसीटीव्हीद्वारे देखरेख आणि दोषींवर कारवाई अशा उपाययोजना प्रशासनाने तातडीने राबवाव्यात अशी मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे.
केडीएमसीच्या स्वच्छता निरीक्षकांनी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्यांसह कचऱ्याला आग लावणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
उच्च दाबाच्या परिसरातील रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासून संबंधितांचा शोध घेणे शक्य होऊ शकते. तसेच, एमआयडीसीने वीजवाहिन्यांखालील मोकळ्या भूखंडांवर नियमानुसार उद्याने विकसित करण्यासाठी आणि झाडे लावण्यासाठी विविध संस्थांना संधी दिल्यास कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा बसू शकतो.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: एमआयडीसीतील निवासी परिसराच्या सर्व्हिस रोडच्या कडेला आणि काही मोकळ्या भूखंडांवर अनधिकृतपणे कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
Ans: प्लास्टिक, थर्माकोल आणि रबर जाळल्यामुळे धूर पसरत असून, परिसरातील प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
Ans: आरएम-२३ समोर, ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या हॉलजवळ, श्री गणराज बँक्वेट हॉल आणि आयडीबीआय बँकेसमोर तसेच सोनारपाडा परिसरातील काही ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.