
तब्बल 11 वर्षांनंतर जनता दरबाराच्या निमित्ताने गणेश नाईकांची मिरा-भाईंदरमध्ये एन्ट्री!
राजकारणात तब्बल अकरा वर्षांच्या विश्रांतीनंतर ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान वनमंत्री गणेश नाईक पुन्हा एकदा मिरा-भाईंदरच्या राजकारणात सक्रिय होत आहेत. शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ते जनता दरबार घेणार असून या उपक्रमामुळे भाजपला मोठे बळ मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात हा जनता दरबार होणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांना आपल्या तक्रारी व समस्या थेट मांडण्याची संधी मिळणार असून, संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित राहून तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश देणार आहेत. भाजपने नागरिकांना आवाहन केले आहे की, “शासनापर्यंत आपली अडचण पोहोचविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा.”
राजकीय विश्लेषकांच्या मते, गणेश नाईकांच्या पुनरागमनामुळे भाजपला मिरा-भाईंदरमध्ये नवसंजीवनी मिळेल. २०१४ पूर्वी नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, ठाणे आणि मिरा-भाईंदर परिसरात त्यांचा प्रचंड प्रभाव होता. पालकमंत्री म्हणून तसेच त्यांचे पुत्र संजय नाईक खासदार असताना त्यांनी समर्थकांची मोठी फळी उभी केली होती.
नंतरच्या राजकीय घडामोडींमुळे ते काही काळ शहराच्या राजकारणापासून दूर राहिले, मात्र आजही त्यांचा एक मजबूत समर्थकवर्ग कायम आहे. यामुळे भाजपला संघटनात्मक पातळीवर मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या मिरा-भाईंदरमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद उघडपणे दिसून येत आहेत. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे.
Maharashtra local body elections: महिला बनणार ठाणेदार! भाजपा, शिंदेसेना, पवार गटाला धक्का
सरनाईक यांनी अलीकडच्या काळात भाजपमधील नाराज नेत्यांना आपल्या गोटात घेतले असून, त्यामुळे शिवसेनेची संघटना मजबूत झाली आहे.अशा पार्श्वभूमीवर गणेश नाईकांची एन्ट्री म्हणजे सरनाईकांचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपची रणनीतिक चाल असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
गणेश नाईक यांनी अलीकडेच ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनता दरबारात सक्रिय सहभाग घेतला होता, आणि त्यानंतर त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. आता मिरा-भाईंदरमध्येही ते लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय पुनरागमनाची औपचारिक सुरुवात झाली, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधीच भाजपने नागरिकांशी थेट संपर्क वाढविणे आणि संघटनात्मक बळकटी साधणे या उद्देशाने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जनता दरबारांची मालिका सुरू केली आहे. मिरा-भाईंदरमधील जनता दरबार हा त्याच मालिकेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
“गणेश नाईक हे ठाणे आणि मिरा-भाईंदरच्या सामाजिक-राजकीय पटावर अजूनही प्रभावशाली आहेत.
त्यांच्या पुनरागमनामुळे भाजपला संघटनात्मक आत्मविश्वास मिळेल आणि मतदारांमध्ये नव्या ऊर्जेची भावना निर्माण होईल.” असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
गणेश नाईकांच्या पुनरागमनामुळे मिरा-भाईंदरचे राजकारण नव्या समीकरणांच्या उंबरठ्यावर उभे आहे.
भाजपसाठी हे पुनरागमन केवळ एक कार्यक्रम न राहता, आगामी निवडणुकांचा रणनीतिक वळण ठरू शकते, अशी चर्चा शहरभर रंगली आहे.