
KDMC sabhapati clash
Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दहा प्रभाग समिती सभापतीपदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, या दहा पदांसाठी एकूण १८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती असतानाही काही प्रभागांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दहा प्रभागांपैकी चार प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या चार प्रभागांमध्ये सध्याच्या स्थितीत बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, उर्वरित सहा प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप, मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे. ज्या प्रभागांमध्ये भाजपचे संख्याबळ अधिक आहे, अशा ठिकाणी भाजपने सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे युतीतील जागावाटप आणि सभापतीपदाच्या निवडीवरून मित्रपक्षांमध्ये मतभेद आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणुकीपूर्वी युतीतील नेत्यांमध्ये समन्वय साधला जाणार की शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या राजकीय संघर्षाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणातही उमटत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत युतीतील घटक पक्षांनी दाखल केलेले स्वतंत्र उमेदवारी अर्ज हे केवळ स्थानिक राजकीय समीकरणांचा भाग आहेत की युतीतील अंतर्गत मतभेदांचे संकेत आहेत, येणारा निवडणुका पूर्वी युतीतील नेते हा वाद मिटवणार की पुढे काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
आता उमेदवारी अर्जांची छाननी, माघारीची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी कोणते उमेदवार रिंगणात राहतात, यावर पुढील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.