
लता मंगेशकर कुटुंबीयांना धक्का! संगीत विद्यालयाला लागला ‘ब्रेक’; २५ कोटींचा प्रकल्प रद्द करून उभारणार महापौर निवास?
भारतरत्न आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मिरा-भाईंदर शहरात उभारण्यात येणाऱ्या संगीत विद्यालयाचा प्रकल्प रद्द करून त्याच जागी महापौर निवास उभारण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यामुळे आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, सुमारे २५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे तब्बल ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. अशावेळी हा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीटंचाईवर सिडकोचा ॲक्शन प्लॅन; ३४ टँकर GPSच्या निगराणीखाली
मिरा रोड येथील सेव्हन इलेव्हन क्लबजवळ असलेल्या महापालिकेच्या मैदानातील १५ टक्के जागेवर भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुमारे तीन वर्षांपूर्वी, २७ सप्टेंबर रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
मात्र आता, मिरा रोड येथील भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुलाचा प्रकल्प रद्द करून त्याच जागी महापौर निवास उभारण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या आहेत. सुमारे २५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, आता संगीत विद्यालयाऐवजी महापौर निवास उभारण्याचा या निर्णयावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात आधीच महापौर निवास असताना दुसऱ्या निवासाची गरज काय, असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला असून, महापालिका आयुक्तांना या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे संगीत विद्यालयाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आता सेव्हन इलेव्हन क्लबजवळ असलेल्या महापालिकेच्या मैदानातील १५ टक्के जागेवर भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल उभारणार की महापौर निवास याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतरत्न लतादीदींच्या नावाने सुरू असलेला प्रकल्प अर्ध्यावर थांबवून तिथे स्वतःचे आलिशान महाल उभारण्याची ही प्रवृत्ती केवळ संतापजनकच नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी आहे, असे सांगत सरनाईक यांनी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना या प्रकरणात तातडीने आणि गांभीर्याने लक्ष घालण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.