
चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! मीरा-भाईंदर महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका शाळांमध्ये (Mira Bhayandar Schools) शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने उलटले असतानाही विद्यार्थ्यांना अद्याप पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आलेले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शाळेत बाटली नसलेल्या विद्यार्थ्यांना तहान लागल्यावर शिक्षकांची परवानगी घेऊन वर्गाबाहेर जाऊन पाणी प्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना स्टीलच्या आवरणाच्या पाण्याच्या बाटल्या पुरविण्यासाठी एप्रिल महिन्यातच खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आल्याची माहिती असून, प्रत्येक बाटलीसाठी सुमारे २१० रुपये दर निश्चित करण्यात आल्याचे समजते. तरीही प्रत्यक्ष वाटप रखडल्याने महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या हिंदी, उर्दू, मराठी आणि गुजराती माध्यमांच्या एकूण ३६ शाळा आहेत. या शाळांमध्ये आठ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांतील असल्याने त्यांना महापालिकेकडून दरवर्षी गणवेश, बूट, वह्या-पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. हे साहित्य शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला किंवा किमान पहिल्या आठवड्यात मिळणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून साहित्यवाटपात विलंब होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत.
यंदाही गणवेश, वह्या-पुस्तके आणि इतर साहित्याच्या वाटपात विलंब झाल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते. त्यातच आता पाण्याच्या बाटल्यांची भर पडली आहे. काही विद्यार्थी घरून पाण्याच्या जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या किंवा शीतपेयांच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून शाळेत आणत आहेत. ज्यांच्याकडे बाटली नाही, त्यांना वर्ग सुरू असतानाही पाणी पिण्यासाठी बाहेर जावे लागते. विशेषतः मधल्या सुट्टीत जेवणानंतर पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांना स्टीलच्या आवरणाच्या पाण्याच्या बाटल्या पुरविण्यासाठी एप्रिल महिन्यातच कंत्राट प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. एका बाटलीसाठी सुमारे २१० रुपये दर निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना असतानाही सप्टेंबर महिना उजाडला तरी बाटल्यांचे वाटप झालेले नाही. त्यामुळे कंत्राट दिल्यानंतर प्रत्यक्ष पुरवठा आणि वाटप प्रक्रियेत नेमका विलंब कुठे झाला, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याअंतर्गत शूजही पुरविले जातात. यापूर्वी मुलगे आणि मुलींसाठी त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या डिझाइनचे बूट दिले जात होते. मात्र, यंदा मुलांसाठीचेच बूट मुलींनाही देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गरजा आणि वापराचा विचार न करता साहित्यवाटप केले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या एका कंपनीला अनेक वर्षांपासून कंत्राट दिले जात असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कंत्राट प्रक्रिया, साहित्याचा दर्जा, पुरवठ्याची वेळ आणि वितरण याची सखोल तपासणी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
शैक्षणिक साहित्यवाटपात दरवर्षी होणारा विलंब लक्षात घेऊन काही काळ महापालिकेने साहित्याऐवजी त्यासाठीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर हा निर्णय रद्द करून पुन्हा महापालिकेमार्फतच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. आता साहित्यवाटपात पुन्हा विलंब होत असल्याने या निर्णयाच्या अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी शाळा सुरू होण्यापूर्वीच गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती आहे. मात्र, प्रत्यक्षात साहित्यवाटपात विलंब झाल्याने प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव समोर येत असल्याची टीका पालकांकडून होत आहे.
पाण्याची बाटली ही विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजेची वस्तू असताना तिच्या वाटपासाठी चार महिने प्रतीक्षा करावी लागणे ही बाब गंभीर असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. बाटल्यांचा पुरवठा नेमका का रखडला, कंत्राटदाराने वेळेत साहित्य उपलब्ध केले का, विलंबासाठी जबाबदार कोण आणि संबंधित कंत्राटदारावर महापालिका प्रशासन कारवाई करणार का, याबाबत पालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात महापालिकेची बाजू जाणून घेण्यासाठी उपायुक्त कविता बोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक