
मिरा-भाईंदरमधील 432 विहिरी बेपत्ता! ( सौजन्य - सोशल मीडिया )
मिरा-भाईंदर शहराच्या जडणघडणीपूर्वी भाईंदर, गोडदेव, नवघर, खारी, घोडबंदर, मिरे, काशी, वरसावे, मुर्धा, राई, मोरवा आणि डोंगरी यांसारख्या गावांमध्ये विहिरींचे पाणी पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी व शेती-बागायतीसाठी मुख्य आधार होते. मुंबईलगतचा परिसर असल्याने येथे वेगाने नागरीकरण झाले आणि नगरपरिषदेचे रूपांतर पुढे महानगरपालिकेत झाले. मात्र, या सिमेंटच्या जंगलात नैसर्गिक पाण्याचे साठे दुर्लक्षित राहिले. माहिती अधिकारात नगररचना विभागाने दिलेल्या पूर्वीच्या विकास आराखड्यानुसार शहरात ११५ सार्वजनिक आणि ३९३ खासगी अशा एकूण ५०८ विहिरींची नोंद होती. मात्र, महापालिकेच्या सद्यस्थितीतील नोंदीनुसार शहरात केवळ ५४ सार्वजनिक आणि २२ खाजगी अशा एकूण ७६ विहिरीच अस्तित्वात आहेत.
भूजल पातळी टिकवून ठेवण्यात विहिरींचे योगदान अत्यंत मोलाचे असते. एकीकडे पाणीटंचाई निवारणासाठी व शिल्लक विहिरींच्या संवर्धनासाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते, तर दुसरीकडे मूळ विहिरीच नष्ट होत असल्याने प्रशासकीय नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे.
शहरावरील पाणीटंचाईचे सकट दिवसेंदिवस गडद होत असताना, प्रशासनाने जुन्या ५०८ विहिरींच्या नोंदीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी करावी, बेपत्ता विहिरीचा शोध घेऊन त्या बुजवणा-यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमधून केली जात आहे.
या दोन्ही अधिकृत आकडेवारींची तुलना केल्यास सार्वजनिक वापरातील ६१, तर खासगी ३७१ अशा मिळून तब्बल ४३२ विहिरी कागदोपत्री आणि प्रत्यक्ष पटलावरून गायब झाल्याचे स्पष्ट होते. जमिनींचे गगनाला भिडलेले भाव आणि बिल्डरांचे हितसंबंध यामुळे या विहिरी बुजवून त्यावर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या की प्रशासनाने हेतुपुरस्सर या नोंदी गाळल्या, याबाबत संशयाचे वातावरण आहे.
Ans: पूर्वीच्या विकास आराखड्यानुसार शहरात ५०८ विहिरींची नोंद होती, जी आता घसरून केवळ ७६ वर आली असून तब्बल ४३२ विहिरी बेपत्ता झाल्या आहेत.
Ans: शहरात झालेले बेसुमार नागरीकरण, सिमेंटची जंगले आणि जमिनींचे वाढते भाव यांमुळे विहिरी बुजवून त्यावर इमारती उभ्या राहिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Ans: प्रशासनाने जुन्या ५०८ विहिरींच्या नोंदींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी करावी आणि बेपत्ता विहिरी बुजवणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.