
Pratap Sarnaik (Photo Credit- X)
शिवसेनेच्या वचननाम्यानुसार मिरा-भाईंदरमधील १९८४ पूर्वीच्या जुन्या व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुलभ करण्यात येणार असून रहिवाशांना अधिकृत आणि सुरक्षित घरे मिळवून देण्यावर भर देण्यात येणार आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढून स्थानिक अडचणी लक्षात घेऊन नियम अधिक व्यवहार्य बनवले जातील, असे शिवसेनेच्या वचननाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे .
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मिरा-भाईंदरमध्ये एज्युकेशन हब आणि विद्यापीठ उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. नामांकित शैक्षणिक संस्था व विविध विद्यापीठे शहरात आणल्यास स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. याशिवाय शहराला फ्री वायफाय सिटी म्हणून विकसित करून विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांना मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून डिजिटल शिक्षण, ई-गव्हर्नन्स आणि व्यवसायांना चालना दिली जाणार आहे. शहरी वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आधुनिक आणि पर्यावरणपूरक पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचेही वचननाम्यात नमूद आहे. या प्रकल्पामुळे मिरा-भाईंदर शहर स्मार्ट मोबिलिटीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना शिवसेनेतर्फे शिष्यवृत्ती
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी युपीएससी आणि एमपीएससीचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना शिवसेनेतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येईल. यामुळे सामान्य कुटुंबातील युवकांना प्रशासकीय सेवेत संधी मिळेल, असे सरनाईक यांनी सांगितले.
डिम्ड कनव्हेयन्स प्रक्रियेचे शुल्क माफ
गृहनिर्माण संस्थांच्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी डिम्ड कनव्हेयन्स प्रक्रियेचे शुल्क पूर्णतः माफ करण्यात येणार असून त्यामुळे आर्थिक बोजा कमी होईल. तसेच उत्तन येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याने वाहन नोंदणी, परवाने व इतर परिवहन सेवा स्थानिक पातळीवर जलद आणि सुलभ मिळतील, असा दावा शिवसेनेच्या वचननाम्यात करण्यात आला आहे.