
फोटो सौजन्य-गुगल
सीबीडी बेलापूर येथील स्वामी विवेकानंद नगर परिसरातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या वारकरी भवनाच्या वापरावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या सभागृहात मांसाहारी भोजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याच्या तक्रारींसह ३० तारखेला झालेल्या एका कार्यक्रमात कथित मद्यपान झाल्याच्या चर्चेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच वारकरी भवनाचे नामकरण बदलावे किंवा या सभागृहाच्या वापराबाबत कठोर नियमावली लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे सरचिटणीस विनय मोरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
स्वामी विवेकानंद नगर म्हणजेच सीबीडी येथील या वारकरी भवनाच्या मागील बाजूस भगवान शंकराचे मंदिर आहे. त्यामुळे सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमांमुळे मंदिराचे पावित्र्य, परिसराची स्वच्छता आणि नागरिकांच्या धार्मिक भावना जपल्या जाणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वारकरी संप्रदाय हा भक्ती, शाकाहार, संयम आणि सात्तत्वक जीवनशैलीशी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत ‘वारकरी भवन’ असे नाव असलेल्या सभागृहात मांसाहारी भोजनाचे कार्यक्रम होत असल्याच्या तक्रारींमुळे वारकरी संप्रदायाच्या नावाबाबत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सभागृहाला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे किंवा सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मता दर्शविणारे अन्य नाव निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा वारकरी भवन हे नाव कायम ठेवायचे असल्यास त्याला साजेशी वापराची नियमावली आणि स्पष्ट निर्बंध लागू करावेत, असेही त्यांनी सुचविले आहे.
दरम्यान, ३० तारखेला सदर सभागृह आरक्षित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मांसाहारी भोजनासोबत मद्यपान झाल्याची चर्चा सीबीडी परिसरात सुरू असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या चर्चेची सत्यता तपासण्यासाठी महानगरपालिकेने सभागृहाचे बुकिंग रजिस्टर, आयोजकांची माहिती, परवानगीच्या अटी आणि कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवश्यक माहिती घेऊन मद्यपान झाले होते किंवा नाही, याची अधिकृत शहानिशा करावी. नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधित आयोजकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सभागृहातील कार्यक्रम संपल्यानंतरही मंडप व्यावसायिक आणि कैटरर्सचे साहित्य परिसरात पडून राहत असल्यामुळे सार्वजनिक जागेवर अतिक्रमण होत असून परिसराच्या स्वच्छतेला आणि सौंदर्गीकरणाला बाधा निर्माण होत असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत संबंधित महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आयोजकाला नियमबाह्य सवलती दिल्या जात आहेत का, याची तपासणी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: सीबीडी बेलापूर येथील स्वामी विवेकानंद नगर परिसरात नवी मुंबई महानगरपालिकेचे वारकरी भवन आहे.
Ans: सभागृहात मांसाहारी भोजनाचे कार्यक्रम होत असल्याच्या तक्रारी आणि एका कार्यक्रमात कथित मद्यपान झाल्याच्या चर्चेमुळे वाद निर्माण झाला आहे.
Ans: वारकरी संप्रदायाच्या विचारांशी सभागृहातील कथित कार्यक्रम विसंगत असल्याने गैरसमज निर्माण होऊ शकतो, असे विनय मोरे यांचे म्हणणे आहे.