
navi mumbai diesel siezed
नवी मुंबई : तुर्भे परिसरात इंधनाच्या कथित अवैध हस्तांतरणाचा प्रकार समोर आला आहे. मुंबई-ठाणे शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत दोन टँकर आणि हजारो लिटर इंधनसदृश पदार्थ जप्त केले आहेत. जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत ९४ लाख ३६ हजार ७०८ रुपये असून, या प्रकरणी पाच जणांविरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Navi Mumbai News)
शिधावाटप विभागाच्या पथकाला डिझेल वाहून नेणाऱ्या एका टँकरच्या आउटलेटमधून दुसऱ्या टँकरमध्ये इंधन भरले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
कारवाईदरम्यान WB 19 L 2981 क्रमांकाचा टँकर आणि MH 46 BM 9202 क्रमांकाचा दुसरा टँकर ताब्यात घेण्यात आला. या दोन्ही टँकरमधून सुमारे १४ हजार लिटर डिझेल आणि २५ हजार लिटर पेट्रोलियमसदृश द्रवपदार्थ जप्त करण्यात आला.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत ९४ लाख ३६ हजार ७०८ रुपये असल्याची माहिती विभागाने दिली आहे. या प्रकरणी दोन्ही टँकरच्या चालक-मालकांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबईचे चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपनियंत्रक गणेश बेल्लाळे यांच्या पथकाच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.
या संयुक्त कारवाईत मुंबईतील भरारी पथक आणि बेलापूर शिधावाटप कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. संबंधित इंधनाचे स्वरूप, हस्तांतरणामागील कारण आणि प्रकरणातील इतर बाबींचा तपास आता तुर्भे पोलीस करीत आहेत.
इंधनाच्या अनधिकृत हस्तांतरणाच्या संशयावरून झालेल्या या कारवाईमुळे परिसरात लक्ष वेधले गेले आहे. मात्र, प्रकरणातील आरोप सिद्ध झालेले नसून, पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना! सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला 6 हजार रुपये