
SIR फॉर्म प्रकरणावरून खळबळ! मतदारांचे SIR फॉर्म सफाई कर्मचाऱ्याकडे कसे? तेजस्वी पाटील यांचा गंभीर सवाल
विजय काते, भाईंदर : विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर)-२०२६ संदर्भातील मतदार नोंदणी प्रक्रियेवर आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना भाईंदर पश्चिम येथील मनपा संचालित उर्दू शाळेत एसआयआरचे गणना फॉर्म सफाई कर्मचाऱ्याच्या ताब्यात आढळल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. समाजसेविका तेजस्वी पाटील यांनी याप्रकरणी मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ (१४५) च्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. (SIR Form Controversy)
तक्रारीनुसार, तेजस्वी पाटील यांनी उर्दू शाळेच्या पाचव्या मजल्यावर अचानक भेट दिली. शुक्रवार असल्याने विद्यार्थ्यांना लवकर सुट्टी देण्यात आली होती. यावेळी शाळेतील महिला सफाई कर्मचाऱ्याकडे भारत निवडणूक आयोगाचे मोठ्या प्रमाणात गणना फॉर्म आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
एसआयआर प्रक्रिया ही मतदार यादीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने संबंधित फॉर्म अधिकृत व्यक्तीव्यतिरिक्त अन्य व्यक्तीच्या ताब्यात असणे गंभीर बाब असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. एसआयआर फॉर्म हे सरकारी दस्तऐवज असून ते हाताळण्याचा अधिकार नियुक्त बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) किंवा अधिकृत अधिकाऱ्यांनाच असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
महाराष्ट्रात एसआयआरअंतर्गत बीएलओंकडून सर्वेक्षण व गणना प्रपत्र जमा करण्याची अंतिम मुदत सुरुवातीला ८ ऑगस्ट होती. त्यानंतर ती १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली. या प्रक्रियेतील माहितीच्या आधारे ३१ ऑगस्ट रोजी प्राथमिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मनपा शाळेत फॉर्म कशा प्रकारे आणि कोणाच्या परवानगीने पोहोचले, ते सफाई कर्मचाऱ्याच्या ताब्यात कसे आले, याची चौकशी करावी. तसेच निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी तेजस्वी पाटील यांनी केली आहे.
SIR म्हणजे Special Intensive Revision (विशेष सखोल पुनरीक्षण). ही मतदार यादीची सखोल पडताळणी/पुनरीक्षण प्रक्रिया आहे. भारत निवडणूक आयोगाकडून पात्र मतदारांची नावे मतदार यादीत योग्य प्रकारे समाविष्ट आहेत का, अपात्र किंवा दुबार नोंदी आहेत का, स्थलांतरित किंवा मृत मतदारांची नावे अद्ययावत करणे आवश्यक आहे का, यासाठी अशी प्रक्रिया राबवली जाते.
SIR प्रक्रियेत मतदारांना Enumeration Form / गणना प्रपत्र दिले जाऊ शकते. मतदाराकडून आवश्यक माहिती घेऊन संबंधित निवडणूक यंत्रणा आणि बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) त्याची पडताळणी करतात. त्यानंतर मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाते आणि नागरिकांना नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी निर्धारित मुदत दिली जाते. अंतिम पडताळणीनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होते.