
आणखी एक बळी! रस्त्यावरील खड्ड्याने हिरावला TDRF जवानाचा जीव; भिवंडी दुर्घटनेतील बचाववीर काळाच्या पडद्याआड
काही दिवसांपूर्वी भिवंडीतील चार मजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर TDRFचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात विकास गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, कर्तव्य बजावत असलेल्या या जवानाचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विकास गोरे हे कामावर जात असताना शहापूर तालुक्यातील भारंगी नदी परिसरातील रस्त्यावर मोठ्या खड्ड्यात त्यांच्या बुलेट दुचाकीचा तोल गेला. खड्ड्यात जोरात धडक बसल्याने ते रस्त्यालगतच्या सुरक्षा भिंतीवर आदळले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना सोमवार (३ ऑगस्ट) रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे TDRF तसेच स्थानिक प्रशासनात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, भिवंडी-ठाणे मार्गावरील राहनाळ येथेही रस्त्यावरील खड्ड्यामुळे आणखी एक जीव गेला. सुनीता पाल (वय ४६) या पती अक्षयलाल यांच्यासोबत दुचाकीवरून अंजूरफाटा परिसरातून परतत असताना काँक्रीट रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरली. या अपघातात अक्षयलाल रस्त्याच्या कडेला पडले, तर सुनीता पाल रस्त्याच्या मध्यभागी पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे पती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत.
अल्पावधीतच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दोन गंभीर अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू