भिवंडी दुर्घटनेवर सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश, मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोहिनूर’ नावाची ही चार मजली इमारत भिवंडीतील बालाजी नगर येथे होती. इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. या इमारतीत एकूण 48 खोल्या होत्या. प्रत्येक मजल्यावर 12 खोल्या असून अनेक कुटुंबे येथे वास्तव्यास होती.
भिवंडीत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, 7 जणांचा मृत्यू
भिवंडीतील चार मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि बचावकार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून बचाव आणि मदतकार्य अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच या दुर्घटनेबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतीबाबत निष्काळजीपणा झाला का, याची सखोल चौकशी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
भिवंडीत एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापालिका… — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2026
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही दुर्घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाकडून सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. याशिवाय, दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व नागरिकांवर तातडीने आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार करण्यात यावेत, तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
दुर्घटनेनंतर राज्य सरकारने या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतरही ती पूर्णपणे रिकामी का करण्यात आली नाही, दुरुस्तीच्या कामांमध्ये नियमांचे पालन झाले का आणि संबंधित अधिकारी किंवा इमारत व्यवस्थापनाची जबाबदारी काय होती, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.






