फोटो सौजन्य- X
महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात धनंजय बोडारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विठ्ठलवाडी येथील श्रीराम टॉकीज चौकातून बोडारे यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. “ड” प्रभाग क्षेत्र येथे निवडणूक कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
विकास मार्गी लावण्यासाठी लोकं मशाल पेटवतील
गेले पंधरा वर्षे रखडलेला कल्याण पूर्वेचा विकास मार्गी लावण्यासाठी लोकं मशाल पेटवतील असा विश्वास बोडारे यांनी व्यक्त केला. तर पक्षातील जे नाराज आहेत त्यांची वरीष्ठ नेते समजूत काढतील असेही त्यांनी प्रसिद्धी माध्यामासमोर सांगितले. या शक्ती प्रर्दशन रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शिवसैनिक ,युवासैनिक, महिला आघाडी, शिवसेना संपर्क प्रमुख गुरूनाथ खोत, कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख शरद पाटील, माजी आमदार पप्पू कलानी, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी प्रकाश तरे, विजय मोरे, आम आदमी पक्षाचे धनजंय जोगदंड, माजी नगरसेविका वसूधंरा बोराडे, महिला आघाडीच्या मीना माळवे, तेजस्वी पाटील रॅलीत सहभागी होते.
गणपत गायकवाड सलग तीन टर्म आमदार
कल्याण पूर्व मतदारसंघाच्या मागील निवडणूकीचा विचार केल्यास या मतदारसंघातून 2004 पासून विद्यमान आमदार गणपत गायकवाड हे निवडून येत आहेत. त्यांनी 2009 आणि 2014 च्या निवडणूकीत अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. तर 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपकडून निवडणूक लढवत सलग तिसरा विजय मिळवला होता. फेब्रुवारीमध्ये हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिंदे गटांच्या पदाधिकाऱ्यांवर केलेल्या गोळीबारामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या गणपत गायकवाड हे जेलमध्ये आहेत.
‘शिवसैनिक एकच’ ठाकरे गटाचे उमेदवार बोंडारेंचे भुवया उंचावणारे वक्तव्य
या निवडणूकीमध्ये भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना संधी दिली आहे. सुलभा गायकवाड यांनी याअगोदरच उमेदवारी अर्ज भरला आहे. शिंदे गटातील महेश गायकवाड आणि त्यांच्यासाथीदारांवर केलेल्या घटनेमुळे कल्याण पूर्व भागात शिवसेना आणि भाजपमध्ये तणावाचे वातावरण होते. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोंडारे यांनीही शिवसेना दोन गटात विभागली असली तरीही शिवसैनिक एक आहेत असे वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे शिंदे गटाकडून मदत मिळू शकते असा सूतोवाच केला आहे. ठाणे जिल्ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनाही या मतदारसंघातून उमेदवारी पाहिजे होती मात्र महायुतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ भाजपकडे कायम राहिला. भाजपला या मतदारसंघात विजयी होण्यासाठी शिंदे गटाची मदत आवश्यक आहे. मात्र शिंदे गटाचे कार्यकर्त्ये नेमके काय करतात यावरही या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे.