ठाणे / स्नेहा काकडे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपातर्फे ठाणे शहरात जल्लोष व्यक्त करण्यात आला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी कार्यकर्त्यांसह रेल्वे स्टेशनबाहेर जल्लोष करून नागरिकांना लाडू वाटप करीत आनंद व्यक्त केला. भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलाखाली जल्लोष करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत व नृत्य करीत आनंद व्यक्त केला. या वेळी माजी उपमहापौर सुभाष काळे, मुकेश मोकाशी, माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, समीरा भारती, उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्नेहा पाटील, वृषाली वाघुले यांच्यासह पदाधिकारी मंडल अध्यक्ष, विविध प्रकोष्ट प्रमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वातंत्र्यापासून देशातील विविध समाजाकडून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. परंतु, त्याला कॉंग्रेसने विरोध केला. कॉंग्रेसच्या ५४ वर्षांच्या सत्ताकाळात १९५१ ते २०११ पर्यंत झालेल्या जनगणनांवेळी अनुसूचित जाती जमातींची आकडेवारी दिली गेली. मात्र, ओबीसी समाजाची आकडेवारी कधीच दिली गेली नाही, याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले. भाजपाने आजवर जातनिहाय जन गणनेला कधीही विरोध केला नाही . केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी जातनिहाय जनगणनेला भाजपाचा पाठिंबा असल्याचे अनेकदा स्पष्ट केले होते. जनगणनेबरोबरच जातनिहाय गणना व्हावी, भाजपाची भूमिका आहे. आता जनगणनेबरोबरच जातनिहाय गणना होईल, याबद्दल वाघुले यांनी आनंद व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शास्त्रीय पद्धतीने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून समाजात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची मोदी सरकारची भूमिका आहे. याच पद्धतीने मोदी सरकारने २०१९ मध्ये आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, याकडे जिल्हाध्यक्ष वाघुले यांनी लक्ष वेधले.
२०१० मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी जातनिहाय जनगणनेबाबत केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी जातनिहाय जनगणनेसाठी मंत्रिमंडळ गटाची स्थापनाही झाली. परंतु, तत्कालीन केंद्रीय गृह मंत्री पी. चिंदबरम यांनी २०११ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक जनगणनेत जातनिहाय जनगणनेला विरोध केला. जातनिहाय जनगणनेऐवजी कॉंग्रेस सरकारने सामाजिक, आर्थिक जातगणना (एसईसीसी) केली होती. मात्र, त्यात ८ कोटींहून अधिक चुका आढळल्याने आकडेवारी जाहीर केली नाही. मात्र, या मुद्द्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला, असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केला.