उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला (संग्रहित फोटो)
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. राजकीय वर्तुळामध्ये ठाकरे परिवार एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये देखील झालेले दोन गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत देखील अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाच्या रिपोर्टवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करतो आहे. नव्या पिढीला जुनी माहिती मिळावी यासाठी देखील कार्यक्रम ठेवला आहे. पाच विभागातील पवित्र माती आणि पाणी यांचं पूजन होणार आहे. महायुतीला प्रचंड यश मिळालं पण चंदगडची जागा आम्हला जिंकता आली नाही याची खंत आहे. याठिकाणी राजेश पाटील यांनी चांगलं काम केलं होतं, पण बंडखोर उमेदवाराला निवडून दिलं. १०० दिवस पूर्ण झाले पण आम्ही चांगले काम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या कामात आम्ही सातत्य ठेवणार आहोत. चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम आधी गंभीरतेने घेतलं नाही. पण आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आहे की, चांगलं काम केलं पाहिजे,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहलगाम हल्ल्याबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये आमच्या पर्यटकांचा घात केला. त्यांचा बदला घ्यायचा आहे, माझं ही तेच मत आहे. आपण सगळे भारतीय आहोत, भारत कसा मजबूत आहे हे दाखवलं जाईल. घरातील कर्ता माणूस गेला की पैसे देऊन निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही. त्यांच्या वारसांना ५० लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे.
पुढे अजित पवार यांनी केंद्र सरकारवर होणाऱ्या टीकेवर उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “जनगणनेच्या बाबतीत विरोधक दबाव आणू शकतात का? देशाचे पंतप्रधान कुणाच्या दबावात येतील असं वाटतं का? आत्ताच्या सरकारनेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कुठल्या घटकाची लोकसंख्या किती आहे, हे समोर येईल. काँग्रेसची इतकी वर्षे सत्ता होती, ती त्यावेळी का केलं नाही? आम्हाला लोकसभेला मोठा फटका बसला त्यानंतर आम्ही कामाला लागलो त्यामुळे विधानसभेत आम्हाला यश मिळालं,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विरोधकांनी पालकमंत्रिपद आणि लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीवर टीका केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या हफ्त्यांचं नियोजन केलं आहे. आदिती तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने मी या निधीचं नियोजन करायला लावलं. सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न केला जात आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आश्वासन कोणी दिले? रायगडला पालकमंत्री पद दिले नाही म्हणून काही अडलं आहे का? सर्व काम होत आहेत, कोण काय बोललं याच्याबद्दल मला विचारू नका. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे मी माध्यमांतूनच ऐकतोय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची तशी भावना स्वाभाविक आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.