ठाणे / स्नेहा जाधव,काकडे : पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे रोगराई निर्माण होते. या रोगराईमुळे आजारी पडण्याचं प्रमाण जास्त वाढतंं. या सगळ्यात लहान मुलांना कायमच अतिसार होण्याचं प्रमाण जास्त असते. हीच बाब लक्षात घेत ठाणे जिल्ह्यात आरोग्याबाबत विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. बालकांमध्ये अतिसारामुळे होणारे मृत्यू पूर्णपणे थांबविण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे मार्फत ‘अतिसार थांबवा’ ही राज्यस्तरीय मोहीम सोमवार, 16जून ते गुरुवार, 31जुलै 2025 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
राज्यभर एकाचवेळी दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे उन्हाळा व पावसाळा या हंगामात नैसर्गिक कारणांनी वाढणाऱ्या अतिसाराच्या संभाव्य घटनांना प्रतिबंध घालणे आहे. यासाठी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून 0 ते 5 वर्षांखालील बालकांचे सर्वेक्षण, ओआरएस (ORS) व झिंक गोळ्यांचे वाटप, घरोघरी आरोग्य शिक्षण व समुपदेशन आणि आरोग्य संस्थांमध्ये विशेष कॉर्नरची स्थापना करण्यात येणार आहे.
अंदाजे 1,44,000बालकांची संख्या असून 1135आशा स्वयंसेविका सर्वेक्षणासाठी कार्यरत असतील.प्रत्येक आशा कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबात जाऊन मुलांचे आरोग्य सर्वेक्षण करणार. अतिसार आढळल्यास लगेचच ओआरएस व झिंक गोळ्यांचे मोफत वाटप आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून
करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व आरोग्य संस्थांमध्ये ‘ओआरएस व झिंक कॉर्नर’ उभारण्यात येणार असून तेथे आवश्यक साहित्य सहज उपलब्ध असेल.
या संपूर्ण मोहिमेचे तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांच्याकडून करण्यात येणार असून जिल्हास्तरीय देखरेख देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली होईल. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे असणार आहेत. यात २ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व 190 उपकेंद्रांमधून ही मोहीम राबविली जाणार आहे.
विशेष लक्ष केंद्रित क्षेत्रे
मोहीम राबविताना आरोग्य विभाग अति जोखमीच्या क्षेत्रांवर व दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. जसे की, झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, विटभट्टी व स्थलांतरित कामगारांचे वस्तीत, बेघर मुले, दूषित पाणीपुरवठा असलेली गावे, मागील दोन वर्षात अतिसाराची साथ झालेली गावे आहेत.
सामाजिक प्रबोधन व शिक्षण
ग्राम आरोग्य पोषण दिवसांद्वारे मातांना अतिसार प्रतिबंधक उपाय, स्तनपानाचे महत्त्व, स्वच्छतेचे नियम, ओआरएस व झिंकचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हात धुण्याची प्रात्यक्षिके घेतली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.