फोटो सौजन्य- chatgpt
ठाणे रेल्वे स्थानकात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी धडक कारवाई करत परराज्यातून चालणारी विदेशी मद्याची तस्करी उधळून लावली आहे. मंगळुरू एक्सप्रेसमधून उतरलेल्या एका रेल्वे अटेंडंटला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ७१ हजार ५६० रुपये किमतीचा गोवा बनावटीचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. फलाट क्रमांक ८ वर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची उत्पादन शुल्क कोठडी सुनावली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक तथा निरीक्षक आनंद पवार यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
दारूबंदी गुन्ह्यांच्या अनुषंगाने गस्त घालत असताना निरीक्षक आनंद पवार आणि त्यांच्या पथकाला मंगळुरू एक्स्प्रेसमधून मोठ्या प्रमाणावर गोव्यातील मद्याची खेप उतरवली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने दुपारी १२.१५ वाजता ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वर साफळा रचला. गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू एक्सप्रेस फलाटावर येताच दोन मोठ्या बॅग घेऊन संशयास्पदरित्या उतरणाऱ्या एका इस्मानाला पथकाने तत्काळ हटकले.
चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव शिवम छनबस मठपती असे सांगितले असून, तो रेल्वेमध्ये अटेंडन्ट म्हणून सेवेत असल्याचे समोर आले. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या पदाचा आणि गणवेशाचा गैरवापर करून हा इसम स्वतःच्या बॅगेतून मद्याची बेकायदा वाहतूक करत होता. त्याच्याकडील बॅगांची तपासणी केली असता, त्यात गोव्यात विक्रीसाठी मर्यादित असलेल्या महागड्या नामांकित ब्रैड्च्या विदेशी दारूच्या बाटल्यांचा खच आढळला.
आरोपी शिवम मठपती याच्याविरुद्ध कठोर दारूबंदी कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला एका दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. हा मद्यसाठा गोव्यातून नेमका कोठून भरण्यात आला होता आणि ठाण्यातून तो कोणाला विकला जाणार होता. यामागे मोठे आंतरराजीय रॉकेट सक्रिय आहे का, याचा कसून शोध घेतला जात आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






