फोटो सौजन्य- chatgpt
उल्हास नदीपात्रात जांभूळ गावाजवळ मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच पडल्याचे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विषारी रासायनिक सांडपाण्यामुळे हा भयंकर प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत असून, या जलप्रदूषणामुळे केवळ आदिवासी बांधवांच्या मासेमारीवरच गदा आली नाही, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षात पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाची असलेली उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीत मासेमारी करून उदरनिवांह करणाऱ्या आदिवासी बांधवांना या प्रदूषणाचा मोठा फटका बसतो आहे. मंगळवारी स्थानिक मच्छिमार सुनील मुकणे हे जांभूळ गावाजवळ उल्हास नदीत मासेमारीसाठी गेले असता, त्यांना नदीकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने मासे मृत अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ जांभूळ ग्रामपंचायतीचे सरपंच परीक्षित पिसाळ यांना या परिस्थितीची माहिती दिली.
उल्हास नदीत औद्योगिक वसाहतींमधील रासायनिक सांडपाणी आणि आजूबाजूच्या शहरांमधील प्रक्रिया न केलेले सांडपाणी राजरोसपणे सोडले जात असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून होत आहे. या प्रदूषित पाण्यामुळेच पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खालावून माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या प्रकरणी केवळ पंचनामे करून किंवा आश्वासने देऊन प्रशासनाने थांबू नये, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने घटनास्थळी यून पाण्याचे आणि मृत माशांचे नमुने तपासावेत, अशी मागणी सरपंच परीक्षित पिसाळ यांनी केली आहे. तसेच, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांची तातडीची संयुक्त बैठक बोलावून कारवाईचे निर्देश द्यावेत, नदीत सोडल्या जाणाऱ्या नाल्यांची तपासणी करावी आणि राज्याच्या पर्यावरण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नदीत रासायनिक सांडपाणी सोडणारे उद्योग आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि मृत माशांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी, असेही त्यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे. नदीकिनाऱ्यावर मृतावस्थेत पडलेले मासे नागरिकांनी अजिबात उचलू नयेत, ते खाऊ नयेत अथवा त्यांची विक्री करू नये, असे जाहीर आवाहन केले जाते आहे. विषारी पाण्यामुळे मासे मृत झाल्याची शक्यता असल्याने लहान मुलांना नदीकिनारी जाण्यापासून रोखावे आणि नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: ठाणे जिल्ह्यातील जांभूळ गावाजवळ उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळले.
Ans: नदीत सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
Ans: नाही. मृत्यूचे कारण स्पष्ट होईपर्यंत नागरिकांनी मृत मासे उचलू नयेत, खाऊ नयेत किंवा त्यांची विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.






