Thane: एप्रिलमध्ये पाणी पुरवठा होणार खंडित? ठाणे महापालिका प्रशासनाचा थकबाकीदारांना दिला इशारा
ठाणे/ स्नेहा काकडे : पाणी बिलाबाबत ठाणे मनापा आता अॅक्शन मोडवर काम करण्यास सुरुवात केली आहे. पाणी बिलाबाबत पालिकेने आता मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाडून पाणी बील न भरणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात 129 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. वर्षभरात पाणी पुरवठा विभागाने एकून 12790 जोडण्या खंडित केल्या आहेत. दिवसभरात दोन कोटी रुपयांहून अधिक बिलांची वसुली करण्यात आली.पाणी पुरवठा विभागातर्फे थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. पाणी कराबाबत नागरिकांचा हलगर्जीपणा वाढत असल्या कारणाने मनपा आता कठोर कारवाई करण्याची भूमिका घेत आहे.
आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जास्तीत जास्त बिल वसुली करण्यात येणार आहे. मोठे गृहसंकुल, टाॅवर, व्यावसायिक ग्राहक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात आतापर्यंत, 13402 जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. 2361 मोटर पंप जप्त करण्यात आले असून 676 पंप रुम सील करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या महसुलाच्या वसुलीचा आढावा घेतला होता. तसेच, मार्चअखेरपर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश दिले होते.
पाणी पुरवठा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या 225 कोटी रुपयांपैकी 136 कोटी रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली गेल्यावर्षीच्या याच काळातील वसुलीपेक्षा 13 कोटी रुपयांनी अधिक आहे. मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार आहे. तसेच, थकबाकीवरील प्रशासकीय आकार / दंड/ व्याज यांच्यावर लागू असलेली 100 टक्के माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही. या अभय योजनेची मुदत 31 मार्च, 2025 पर्यंतच राहणार आहे.