
मीरा-भाईंदरमध्ये भाजप–शिवसेना युतीच्या चर्चांना वेग; भाजपाच्या ठोस अटींमुळे राजकीय वातावरण तापले
भाजपाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाने स्वतःसाठी ६६ जागांची मागणी केली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ८ जागा देण्यास तयारी दर्शवली आहे. उर्वरित २१ जागांबाबत शिवसेनेचे नेते व राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. मात्र, युती अंतिम होण्यासाठी भाजपाने काही अटी स्पष्टपणे समोर ठेवल्या आहेत.
भाजपाच्या प्रमुख अटींपैकी एक महत्त्वाची अट म्हणजे भाजपातून शिवसेनेत गेलेले सर्व पदाधिकारी पुन्हा भाजपात परत करण्यात यावेत. ही अट पूर्ण झाल्याशिवाय युतीबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला जाणार नसल्याचे संकेत भाजपाने दिले आहेत. याशिवाय, शहरातील वादग्रस्त ठरलेल्या शिवार गार्डनच्या व्यावसायिकीकरणाचा मुद्दाही भाजपाने पुढे आणला आहे. शिवार गार्डनचे व्यावसायिकीकरण तात्काळ थांबवण्यात यावे, अशी ठाम मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेनेनेही युतीबाबत सकारात्मक सूर लावला आहे. शिवसेना नेते व राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी युतीसाठी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “२०१७ च्या तुलनेत २०२५ मध्ये शिवसेना पक्ष अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे युतीमध्ये समसमान जागावाटप व्हावे, ही आमची अपेक्षा आहे. मात्र भाजप हा मोठा पक्ष आहे, त्यांनी काही जागा अधिक घेतल्या तरी शिवसेनेला त्यास हरकत नाही. आम्ही युतीसाठी पूर्णपणे तयार आहोत.”
सरनाईक यांच्या या विधानामुळे युतीची शक्यता अधिक बळावली असली, तरी भाजपाने ठेवलेल्या अटींवर शिवसेनेची नेमकी भूमिका काय राहणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेषतः पदाधिकारी परत घेण्याची अट आणि शिवार गार्डनचा मुद्दा यावर शिवसेना काय निर्णय घेते, यावरच युतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
एकूणच, मीरा-भाईंदरमधील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युतीबाबत हालचालींना वेग आला असून, पुढील काही दिवसांत होणाऱ्या चर्चांमधून अंतिम तोडगा निघतो का, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.