अडीच वर्षांची 'वियाना' घरातून बेपत्ता! दिवाळीच्या तोंडावर कुटुंब हादरले (Photo Credit - FB)
दिवा: शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी घरातून नजरचुकीने बाहेर पडलेल्या अडीच वर्षांच्या बालिकेचा, वियानाचा शोध मुंब्रा पोलिसांनी अवघ्या अडीच तासांत लावत तिला तिच्या कुटुंबाकडे सुखरूप परत केले. एका मेडिकल दुकानदाराची सतर्कता आणि डेअरी चालकाने दिलेल्या महत्त्वाच्या माहितीमुळे पोलिसांना हे यश मिळाले. मुलीच्या पालकांनी मुंब्रा पोलीस स्टेशनचे पी. आय. अनिल शिंदे, ए.पी.आय. अमोल सर आणि ए.पी.आय. अनिल सर यांच्यासह संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले आहेत.
दिवा येथील अथर्व आर्केडमध्ये राहणारे एक कुटुंब शुक्रवारी सकाळी घराच्या शिफ्टिंगच्या गडबडीत असताना ही घटना घडली. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास, धावपळीत नजरचुक झाल्याने त्यांची अडीच वर्षांची मुलगी वियाना सोसायटीच्या बाहेर पडली. ती एकटीच मार्केटच्या नेहमीच्या रस्त्यावरून चालत जवळपास एक किलोमीटर दूर गेली. वियाना घरात नसल्याचे लक्षात येताच कुटुंब आणि शेजाऱ्यांनी तातडीने तिचा शोध सुरू केला, परंतु ती कुठेच सापडली नाही. यानंतर कुटंबाने थेट मुंब्रा पोलीस स्टेशनचे पी. आय. अनिल शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि सर्व माहिती दिली.
घडलेली घटना समजताच पी. आय. शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता, तातडीने वियानाच्या वर्णनाचे आणि फोटोचे डिटेल्स ए.पी.आय. अमोल सर आणि ए.पी.आय. अनिल सर यांना पाठवले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या टीमला सतर्क करत परिसरामध्ये मुलीचा तातडीने शोध सुरू केला. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असतानाच, दिव्यातून दातिवलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एका मेडिकल दुकान चालकाला ही लहान मुलगी एकटी फिरताना दिसली. त्यांनी तिला थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण ती व्यवस्थित बोलू शकत नसल्याने काही कळले नाही. त्याचवेळी, परिसरातील एका दूध डेअरी चालकाने पोलिसांना माहिती दिली की, त्यांच्या वर्णनाची एक मुलगी त्या मेडिकल दुकानाजवळ फिरत आहे. हा सुगावा मिळताच पोलीस त्या दिशेने धावले आणि त्यांना मेडिकलजवळ उभी असलेली वियाना सुखरूप सापडली. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घरातून गेलेली वियाना साडेबारापर्यंत म्हणजेच अवघ्या अडीच तासांत पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे सुरक्षितपणे सापडली.
पोलिसांच्या या अत्यंत तत्परतेमुळे आपली मुलगी चुकीच्या हातात न पडता सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला. कुंटूबाने पी. आय. अनिल शिंदे आणि ए.पी.आय. अमोल आणि अनिल सर यांच्यासह संपूर्ण टीमचे विशेष आभार मानले. “पोलिसांनी देवासारखे धावून आमच्यावर आलेल्या संकटातून आम्हाला बाहेर काढले,” असे कृतज्ञ उद्गार त्यांनी काढले. तसेच, सतर्कता दाखवणाऱ्या मेडिकल दुकानदार आणि डेअरी चालकाचेही त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. या घटनेतून पोलीस यंत्रणेची तत्परता आणि समाजातील जागरूक नागरिकांची मदत किती मोलाची ठरते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.