
‘माझ्या मुलाला सुखरूप परत आणा’; आई रागावली म्हणून घर सोडले, 15 दिवसांपासून फोटोचे बॅनर घेऊन आईचा शोध
वंदना भोईर यांच्या म्हणण्यानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी प्रशिक आणि त्याच्या बहिणीमध्ये किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर त्यांनी प्रशिकला रागावले. याच घटनेनंतर प्रशिक घरातून निघून गेला. सुरुवातीला तो परत येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
प्रशिक बेपत्ता झाल्यापासून वंदना भोईर विविध ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत. मुलाचा फोटो असलेले बॅनर घेऊन त्या नागरिकांकडे चौकशी करत आहेत. प्रशिकबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास ती कुटुंबीय किंवा पोलिसांपर्यंत पोहोचावी, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
वंदना भोईर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दोन मुलांचा लहानपणी मृत्यू झाला होता. त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर भावाच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन्ही मुलांना त्यांनी आपल्या घरी आणून त्यांचे पालनपोषण केले. त्यांच्या पतीवर कॅन्सरचे उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. उल्हासनगर परिसरात रिक्षा चालवून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून पतीच्या उपचारांची जबाबदारीही सांभाळत आहेत.
एकीकडे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची आणि पतीच्या उपचारांची जबाबदारी, तर दुसरीकडे बेपत्ता मुलाचा शोध अशा परिस्थितीत वंदना भोईर यांची धावपळ सुरू आहे. “माझ्या मुलाचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा आणि तो सुखरूप परत मिळवून द्यावा,” अशी मागणी वंदना भोईर यांनी केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशिकचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी अपेक्षा कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया आई वंदना भोईर यांनी दिली.
‘बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी…’; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?