
शेवगावात पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट! तीन महिन्यांपासून पाऊस गायब; पिके करपली, शेतकरी हवालदिल
यंदाचा पोळा सणही शेतकऱ्यांना अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. शेतकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण; मात्र पाणी, चारा आणि पिकांच्या संकटामुळे उत्सवाचा उत्साहच हरवून गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. शेतकरी परिस्थितीला तोंड देत असताना आता राजकीय नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आमदार मोनिका राजळे, खासदार निलेश लंके, माजी खासदार सुजय विखे, माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते प्रताप ठाकणे यांच्यासह स्थानिक राजकीय नेत्यांनी या भीषण परिस्थितीची प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी का केली नाही? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
निवडणूक आली की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मतांचा जोगवा मागणारे राजकीय नेते, शेतकरी संकटात असताना त्यांच्या बांधावर कधी दिसणार? असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांची आस्थेने विचारपूस करणारे हेच नेते दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणार कधी? दुष्काळाची तीव्रता प्रशासनाच्या कागदावर मोजण्याऐवजी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करून सरकारकडे ठोस उपाययोजनांची मागणी करणार कोण? असा सवालही उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली पिके संकटात आहेत, जनावरांसाठी चारा अपुरा पडत आहे, पिण्याच्या पाण्याची चिंता वाढत आहे आणि पावसाळ्यातच जर ही परिस्थिती असेल तर आगामी उन्हाळ्यात संकट किती भीषण असेल, याची कल्पनाच शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे. आता शेतकऱ्यांना आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करून पंचनामे, पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि पिकांसाठी आवश्यक मदत याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
आता शेतकऱ्यांना कोणत्याही राजकीय पक्षाची पोकळ आश्वासने किंवा भाषणे नको आहेत. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने खालील पावले उचलणे गरजेचे आहे: तात्काळ पंचनामे-शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून सर्व बाधित पिकांचे सरसकट पंचनामे करावेत. चारा छावण्या व टँकर- जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत आणि पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू करावेत.
आर्थिक मदत व पीक विमा- पीक विम्याची भरपाई आणि शासकीय मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची आक्रमक भूमिका लोकप्रतिनिधींनी सरकारदरबारी मांडावी. निसर्गाने तर पाठ फिरवलीच आहे, पण जर लोकप्रतिनिधींनीही अशीच पाठ फिरवली, तर शेवगावचा शेतकरी शांत बसणार नाही. ‘व्होट बँक’ म्हणून वापर करणाऱ्या पुढाऱ्यांना शेतकरी येत्या काळात त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.