
एफडीएची राज्यभर धडक कारवाई! 3 महिन्यांत 12,083 तपासण्या; तब्बल 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त
FDA News: नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अन्न उत्पादन आणि विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या तपासणीला गती दिली आहे. जून ते ऑगस्ट 2026 या अवघ्या तीन महिन्यांत राज्यभर 12,083 तपासण्या करण्यात आल्या. या कारवाईत 5,269 आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर 603 परवाने निलंबित करण्यात आले. दूध-दुग्धजन्य, इतर तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या कारवाईत सुमारे 67.20 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती FDA ने दिली आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे, क्लब आदी ठिकाणी एकूण 1,803 तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 948 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर 199 परवाने निलंबित करण्यात आले.
FDA च्या तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या Schedule-4 मधील नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. यामध्ये स्वच्छ पाणी आणि योग्य निचरा व्यवस्थेचा अभाव, शीतसाखळीचे उल्लंघन, रेफ्रिजरेटरमध्ये आवश्यक तापमान न राखणे आणि काही ठिकाणी झुरळांचा प्रादुर्भाव अशा त्रुटींचा समावेश आहे.
काही आस्थापनांमध्ये अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अस्वच्छ पद्धतींचा अवलंब, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणातील त्रुटी, अस्वच्छ फरशी, सदोष ड्रेनेज आणि भिंतींवरील उखडलेले प्लास्टर आढळल्याचे FDA ने नमूद केले.
कच्चे चिकन उघड्या भांड्यांमध्ये ठेवणे आणि चिरलेल्या भाज्या योग्य प्रकारे सील न करणे यामुळे Cross-Contamination चा गंभीर धोका असल्याचेही तपासणीत निदर्शनास आले. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व लसीकरणाच्या नोंदी, FoSTaC प्रशिक्षण तसेच अन्नपदार्थांच्या प्रयोगशाळा चाचण्यांचे पुरावे उपलब्ध नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दूध, दुग्धजन्य आणि इतर अन्नपदार्थांच्या तपासणीदरम्यान 2,766 नमुने घेण्यात आले. या कारवाईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा सुमारे 5.40 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
दूध-दुग्धजन्य व इतर अन्नपदार्थांशी संबंधित एकूण 9,485 तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 4,321 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आणि 404 परवाने निलंबित करण्यात आले.
राज्यात पान मसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू आणि इतर प्रतिबंधित पदार्थांविरोधातही FDA ने कारवाई केली. जून ते ऑगस्टदरम्यान प्रतिबंधित पदार्थ आढळलेल्या 795 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये 644 प्रथम खबरी अहवाल (FIR), 867 अटक, 483 आस्थापना सील आणि 110 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 19.62 कोटी रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.
प्रतिबंधित तसेच दूध-दुग्धजन्य पदार्थ वगळता इतर अन्नपदार्थांविरोधात 696 धाडी टाकण्यात आल्या. खाद्यतेल, आंबे, लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गूळ, तूप, खजूर, आईस्क्रीम-कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाले, सुपारी, ताडी आदी पदार्थांशी संबंधित कारवाईत 42.17 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
FDA ने दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांच्या कारवाईतील जप्त साठ्याची विभागणी अशी आहे—दूध व दुग्धजन्य पदार्थ 5.40 कोटी रुपये, इतर अन्नपदार्थ 42.17 कोटी रुपये आणि प्रतिबंधित पदार्थ 19.62 कोटी रुपये. प्रशासनाने एकूण जप्तीचे मूल्य सुमारे 67.20 कोटी रुपये नमूद केले आहे.
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा गैरप्रकाराबाबत नागरिक FDA च्या टोल-फ्री क्रमांक 1800-222-365 वर तक्रार नोंदवू शकतात. तसेच बहुभाषिक AI-सक्षम ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीद्वारे तक्रार नोंदणी, संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्गीकरण, एस्कलेशन आणि तक्रारीचा मागोवा घेण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
FDA ने नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले असून, अन्न आस्थापनांची नियमित तपासणी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याची भूमिका मांडली आहे.