
वडापावप्रेमींनो पाहिलंत का? ४ किलोचा वडापाव अन् २.५ किलोचा समोसा! मीरा-भाईंदरमध्ये खवय्यांची गर्दी
विजय काते, मीरा भाईंदर : मुंबई आणि महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेल्या वडापावचा दिवस (World Vada Pav Day) मीरा-भाईंदरमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जागतिक वडापाव दिनानिमित्त शहरातील इंद्रलोक परिसरातील डिवाइन वडापाव कॉर्नरने चक्क ४ किलो वजनाचा ‘महावडापाव’ तयार केला. एवढेच नाही तर त्यासोबत तब्बल २.५ किलो वजनाचा भलामोठा समोसाही बनवण्यात आला. हे दोन्ही खाद्यपदार्थ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
डिवाइन वडापाव कॉर्नरच्या संचालिका निशा सोनकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हा अनोखा उपक्रम राबविला. जागतिक वडापाव दिन नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी त्यांनी तब्बल ४ किलो वजनाचा वडापाव तयार केला. सामान्यतः हातात सहज मावणारा वडापाव एवढ्या भव्य आकारात पाहून नागरिकही आश्चर्यचकित झाले. महावडापावसोबत तयार करण्यात आलेल्या २.५ किलोच्या समोसानेदेखील उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘वडा पाव’ बनवा आता …
या ४ किलो वजनाच्या महावडापावची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. यापूर्वी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये २ किलो ७०० ग्रॅम वजनाच्या मोठ्या वडापावची नोंद असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. त्यामुळे डिवाइन वडापाव कॉर्नरने तयार केलेला ४ किलोचा वडापाव आता विक्रमाच्या दृष्टीनेही चर्चेत आला आहे. मात्र या नव्या वडापावची कोणत्याही रेकॉर्ड संस्थेकडून अधिकृत नोंद झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जागतिक वडापाव दिनाचे औचित्य साधून मीरा-भाईंदरमधील वडापावप्रेमींसाठी विशेष सवलतही देण्यात आली. या दिवशी ग्राहकांना वडापावच्या किमतीत १० रुपयांची सवलत देण्यात आली. त्यामुळे महावडापाव पाहण्यासोबतच नेहमीच्या वडापावचा आस्वाद घेण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली.
या अनोख्या उपक्रमाला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली. त्यांनी वडापावचा आस्वाद घेत आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मनसेचे शहर नेते संदीप राणे हेदेखील आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला आणखी रंगत आली. परिसरातील नागरिक आणि वडापावप्रेमींनीही महावडापाव आणि भव्य समोसा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.
वडापाव हा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. कमी किमतीत आणि सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ आज स्ट्रीट फूडपासून मोठ्या खाद्य ब्रँडपर्यंत पोहोचला आहे. याच वडापावला जागतिक स्तरावर अधिक ओळख मिळावी आणि महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे वेगळेपण अधोरेखित व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. ४ किलोचा महावडापाव, २.५ किलोचा समोसा आणि वर्ल्ड रेकॉर्डसाठी करण्यात येणारा प्रयत्न यामुळे यंदाचा जागतिक वडापाव दिन मीरा-भाईंदरकरांसाठी विशेष ठरला.
इथे मिळतात ११ प्रकारचे वडापाव – Navarashtra