वडापाव हा महाराष्ट्रातील प्रत्येक खाद्यप्रेमींचा आवडता आणि तितकाच लाडका पदार्थ आहे. मुंबई ठाण्यासारख्या शहरात कष्टाचे काम करणाऱ्या चाकरमान्यांसाठी “वडापाव” (Vada Pav) म्हणजे त्यांचे दोन वेळचे जेवण. लुसलुशीत पावावर बेसनाचे आवरण असलेला गरमागरम बटाटा वडा आणि त्यासोबत चवीला लाल लसणाची आणि पुदिन्याची हिरवी चटणी असा पारंपरिक वडापाव सर्वांनीच खाल्ला असेल. पण जरा निराळ्या चवींचे वडापाव खायचे असतील तर “अलिबागचा वडापाव” (Alibag cha Vadapav)हे ठिकाण वडापावप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. येथे पारंपरिक वडापाव सोबतच खाद्यप्रेमींच्या चवींचे चोचले पुरवण्यासाठी वेगळ्या चवींचे फ्युजन असलेले वडापाव उपलब्ध आहेत.

खरतर अलिबागचा वडापाव ही संकल्पना शेफ रोहन चिमणे यांची असून त्यांनी पारंपारिक वडापाव सह त्यात काहीश्या निराळ्या चवींची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. आजकालची तरुण पिढी ही वडापाव पेक्षा त्याच्याशी साम्य असणाऱ्या बर्गर हा पदार्थ खाण्याकडे अधिक आकर्षित होते. तेव्हा पारंपरिक वडापावमध्ये हटके फ्युजन करून तरुण खवय्यांच्या आवडीनुसार त्याला अधिक चविष्ट बनवण्याचा प्रयत्न चिमणे यांनी केला.

येथे पारंपरिक वडापाव मध्ये खरडा वडापाव, अलिबागचा वडापाव, शेजवान वडापाव, चुरा पाव असे विविध ६ प्रकार उपलब्ध आहेत. तर फ्युजन वडापाव मध्ये तंदूर चीज ग्रील वडापाव, पेरिपेरीं चीज ग्रील वडापाव, बर्गर चीज ग्रील वडापाव, अलिबागचा चीज बस्ट वडापाव, बार्बीक्यू चीज ग्रील वडापाव, मेयो चीज ग्रील वडापाव, राफेल ग्रील वडापाव, गोलमाल चीज ग्रील वडापाव असे तब्बल ११ विविध चवींचे वडापाव येथे उपलब्ध आहेत. तंदूर चीज ग्रील आणि राफेल वडापाव हे नव्या चवींचे वडापाव ग्राहकांच्या अधिक पसंतीस उतरत आहेत.

मुंबई, ठाणे, नवीमुंबई, अलिबाग, अशा बऱ्याच शहरात ‘अलिबागचा वडापाव’ खाद्यप्रेमींसाठी उपलब्ध आहे. पारंपारिक वडापाव सोबत चिमणे यांनी तयार केलेले निराळ्या चवींचे वडापाव खवय्यांची मन जिंकत आहेत.
[read_also content=”मुंबईकरांची पहिली पसंत असलेला वडापावचा इतिहास जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/learn-the-history-of-vada-pav-the-first-favorite-of-mumbaikars-nrrd-318760/”]






