
छत्रपती शिवरायांनी रचला होता अभंग; तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात अभंग उपलब्ध
मुंबई / विजयसिंह जाधव : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व अर्थाने युगप्रवर्तक प्रतिभावंत होते. ज्यांच्या मनात स्वराज्याची कल्पना, प्रजाहिताच्या असंख्य योजना जन्माला आल्या तो राजा सृजनाचा धनी असणे योगाने आलेच. खुद्द शिवाजी महाराजांनी रचलेला एक अभंग तंजावर येथील ऐतिहासिक कागदपत्रात सापडला. त्याचे इतिहास अभ्यासक आशुतोष पाटील यांनी निरूपण केले आहे. त्यातून महाराजांच्या व्यक्तिमत्वातील साहित्य प्रतिभेचा पैलू अधिक उजागर होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व व त्यांचे कर्तृत्व सर्वांना ज्ञात आहे. पण त्याच्या मनात एक कवीही लपलेला होता. हे तंजावर येथील ऐतिहासिक कागदपत्रात सापडलेल्या एका ‘अभंग’ रचनेतून स्पष्ट होते. तामिळनाडूमधील तंजावरला छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू एकोजी महाराज यांच्या वंशजांचे सरस्वती महाल ग्रंथालयात महाराजांनी रचलेला म्हणून एक अभंग आज उपलब्ध आहे. त्यात अनेक जुनी दुर्मिळ कागदपत्रे व दस्तावेज असून भोसले राजघराण्याशी संबंधित कितीतरी कागदपत्रे व हस्तलिखिते तेथे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेला अभंग हे वास्तवच आनंददायी आहे.
मुळातच महाराज जिज्ञासू वृत्तीचे होते आणि साहित्यामधील अनेक विषयांबाबत त्यांना जाण होती. अनेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती करून घेतली होती. राज्यकारभाराच्या व युद्धाच्या धावपळीत जमेल तेवढा वेळ काढून महाराज ग्रंथांशी व साहित्याशी असलेले नाते सांभाळत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अभंगात स्वतःचा नामोल्लेख करतांना ‘शिवराजे’ असे संबोधले आहे. तमिळ प्रांतात सापडलेल्या महाराजांच्या शिलालेखात देखील त्यांना शिवराजे असेच संबोधले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेला हा अभंग सरस्वती महाल ग्रंथालयातील एका हस्तलिखित वहीत असून त्यात इतरही अनेक मान्यवरांनी रचलेले अभंग आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज अभंगात लिहितात
नासिवंत सुखासाटी । अंत्तरला जगजेटी ।।१।। नाहि नाहिं याते गोडी ।। लक्ष चौशीची जोडी ।।२II मणुषजन्म गेल्यावारे । काय करशील बा रे ।।३।। शिवराजे सांगे जना ।। म्या तो सोडिली वासना ।।४।।
भावार्थ :
शिवराय लिहितात, ‘जगासाठी व त्यातील नाशवंत सुखासाठी तू परमेश्वराला विसरतो ? अरे यात गोही
नव्हे. असे केल्याने चौऱ्यांशी लक्ष जन्म-मृत्यूची जोडी तुझ्या वाट्याला येईल. मनुष्य जन्म वाया गेला तर तू काय करशील? म्हणून शिवराजे सांगतात की, मी तर (परमेश्वरासाठी) वासना सोडली आहे.
हेदेखील वाचा : आज महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन; जाणून घ्या १९ फेब्रुवारीचा इतिहास