बोगस बियाणांवर कृषी विभागाची करडी नजर; दुकानदारांवर होणार 'ही' मोठी कारवाई
शिरोळ : जून महिन्यातील खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, शिरोळ तालुक्यात बोगस बियाणांच्या वाढत्या तक्रारींना आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. तालुक्यात बोगस बियाणांचा प्रसार रोखण्यासाठी विशेष तपासणी पथके स्थापन करण्यात आली असून, अनधिकृतरीत्या बियाणांचा पुरवठा करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी स्पष्ट केले आहे.
काळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांपासून बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. काही वेळा या बियाणांमुळे उगमच होत नाही, किंवा उत्पादन क्षमतेत लक्षणीय घट येते. त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या संकटात सापडतात. यंदा अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाने वेळेआधीच पावले उचलली असून, तालुक्याच्या विविध भागांमध्ये चोख तपासणी सुरू करण्यात आली आहे.
बी-बियाणे विक्रेत्यांची यादी तयार
तालुक्यातील सर्व बी-बियाणे विक्रेत्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या दुकानांची नियमित तपासणी केली जात आहे. दुकानदारांनी कृषी खात्याच्या परवानगीशिवाय कोणतीही बियाणे विक्री केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. तपासणी दरम्यान बियाण्यांचे नमुने घेतले जात असून, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत. त्यामधून बोगस बियाणे आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्यात येणार आहेत.
परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करा
कृषी विभागाच्या या कारवाईमुळे अनेक दुकानदार सावध झाले असून, शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी, यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहेत. बोगस बियाणांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत, अशी सूचना कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. बियाणे खरेदी करताना बिलाची मागणी करणे आणि पॅकिंगवरील तपशील काळजीपूर्वक पाहणे अत्यावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी जागरूक राहावे
तालुक्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यांविषयी तक्रारी केल्या असून, त्या प्रकरणांचीही चौकशी सुरू आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून विभागाने ग्रामीण भागात सुद्धा तपासणी पथके पाठवली आहेत. यामुळे बोगस बियाणांचा साठा करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. शिरोळ तालुक्याच्या कृषी विकासासाठी हा हंगाम महत्त्वाचा असून, यामध्ये बोगस बियाणांमुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत. शेतकऱ्यांनीही जागरूक राहून कृषी विभागाशी सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रकांत जांघले यांनी केले.