खरीप हंगामानंतरच देणार का बोनस?; शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
कोल्हापूर : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांना योग्य बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेत उपलब्ध व्हावीत, त्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने चांगलीच कंबर कसली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दुकानदार आणि कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने १० भरारी पथके तयार केली आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी कृषी विभागाने १० भरारी पथके तयार केली असून, या माध्यमातून विक्रेत्यांची सखोल तपासणी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात कृषी भरारी पथकाने कारवाई केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर परवाना रद्द करून दुकान बंद होईल, असा थेट इशारा देखील कृषी विभागाने दिला आहे.
शेती अभियान मोहीम १२ जूनपर्यंत राबविले जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, सेंद्रिय उत्पादन, जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण आणि विविध शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे हा आहे. शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, नाचण्या, मका, उडीद, मूग ,चवळी आदी बियाणे सवलतीच्या दरात ग्रामपंचायतीच्या मार्फत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्याकडून २९ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत उपलब्ध अर्ज मागणीनुसार बियाणांचा पुरवठा केला जाणार आहे.
बनावट माल विक्री केल्यास कारवाई
खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा बनावट माल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला असून, कृषी भरारी पथकाकडून नमुने गोळा करणे, तपासणी अहवाल तयार करणे आणि तत्काळ कारवाई करणे अशी कामगिरी केली जात आहे. यातून शेतकऱ्यांना सढळ मदत होत असून, बोगस माल विक्रेत्यांचे थेट परवाने रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे कायदेशीर कारवाईला गती मिळाली आहे.
खत खरेदीसाठी जबरदस्ती करू नये
अनुदानित रासायनिक खतांची विक्री करताना खते खरेदीसाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करू नये, असे निर्देश परवानाधारकांना दिले आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानातूनच बियाणे, खते आणि कीटकनाशक खरेदी करावे. दुकानदारांकडून पावती घ्यावी. शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार असेल तर तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.