पुण्यात थंडीचा कडाका कायम राहणार; तापमानाचा पारा घसरला, वातावरणात…
शहरात १० अंश सेल्सिअस किमान तर २८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे. परिणामी थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे आणि परिसरामध्ये मंगळवारी (ता. २) आणि बुधवारी (ता. ३) किमान तापमान स्थिर राहणार आहे.
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये थंडीने जोरदार ‘कमबॅक’ केला आहे. शहरातील किमान तापमानाचा पारा घसरल्याने सलग दुसऱ्या दिवशी 10 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवला गेला आहे. तर पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी १५ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान नोंदविण्यात आले होते. मात्र, रविवारी किमान तापमानात पाच अंश सेल्सिअसने घट झाली. तर सोमवारी (ता. १) देखील तापमानातील घट कायम होती. सोमवारी शहरात १० अंश सेल्सिअस किमान तर २८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे. परिणामी थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे आणि परिसरामध्ये मंगळवारी (ता. २) आणि बुधवारी (ता. ३) किमान तापमान स्थिर राहणार असून, किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे.
आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर गुरूवारपासून (ता.४) पुढील तीन दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून, कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
दितवाह चक्रीवादळाचा वाढला धोका
बंगालच्या उपसागराचा गोंधळ सुरु असून, आधी सेनयार चक्रीवादळ आणि आता डिटवाह चक्रीवादळ महाराष्ट्रावर घोंगावतोय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत आलेल्या धुमाकूळ घातलेल्या डिटवाह चक्रीवादळामुळे भारतामध्ये देखील काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.