भाजपला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने दिला राजीनामा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सगळ्याच पक्षांनी आता उमेदवार याद्या जाहीर करायला सुरूवात केली आहे. नुकतीच भाजपने देखील आपली 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बड्या नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नवी मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
वर्षानुवर्षे दिलेल्या पाठिंब्याबद्दल पक्षाचे आभार मानत नाईक यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला. विधानसभा निवणूक 2024 मध्ये ते बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी ते प्रवेश करण्याची शक्यता आहे. लकरच ते तुतारी निवडणूक चिन्हावर उमेदवारी दाखल करणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांचे वडील गणेश नाईक यांना मात्र भाजपने उमदेवारी दिली आहे.
वडील भाजपमध्ये, मुलगा शरद पवार गटात
गणेश नाईकांनी ऐरोली आणि बेलापूरमधून त्यांचा मुलगा संदीपला उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली होती. भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये गणेश नाईक यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. तर बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. त्यामुळे आता संदीप नाईक यांनी शरद पवार गटात जाऊन बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांनी संदीप यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
संदीप नाईकांचा शरद पवार गटात प्रवेश
भाजपने उमेदवारी न दिल्याने संदीप नाईक यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. संदीप नाईक यांच्यासोबत 25 माजी नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) संदीप नाईक यांच्यात सामना होणार आहे.