
चाकण–शिक्रापूर मार्गावर धुळीचे लोट; खड्ड्यांचा रस्ता वाहतूकदारांसह नागरिकांसाठी डोकेदुखी
गेल्या अनेक वर्षांपासून नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला हा महामार्ग आज अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात अडकलेला दिसत आहे. खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेला माती-मिश्रित मुरूम काही दिवसांतच उडून गेल्याने खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. त्यामुळे धुळीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून, श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचेच्या तक्रारी यांसारख्या समस्या वाढीस लागल्या आहेत. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी आणि धुळीच्या ढगांमुळे नागरिकांना प्रवास करणे अक्षरशः कठीण झाले आहे.
दरम्यान, चाकण परिसरात काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम सुरू असले तरी त्याचा वेग अत्यंत मंद असल्याने नागरिक रात्री-दिवस त्रास सहन करत आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले असूनही अद्याप ठोस उपाययोजना राबविण्यात आलेल्या नाहीत.
“दररोज धुळीचा सामना करावा लागतो; मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने रस्ता दुरुस्त करून धूळ नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“तळेगाव–चाकण–शिक्रापूर या राज्य महामार्गची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, नागरिकांसह रस्त्यालगतचे व्यावसायिकही प्रचंड त्रस्त झाले आहेत. गेली कित्येक वर्षे रस्त्याच्या नूतनीकरणाकडे सरळ दुर्लक्ष केले जात आहे. शासन आणि संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे.” – साहेबराव कड (सामाजिक कार्यकर्ते)