
चिखलेत समुद्रधूपचा वाढता धोका कायम! नवीखाडी, वडकतीपाडातील किनारा ढासळल्याने उद्भवली स्थिती
अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यामुळे चिखले येथील नवी खाडी तसेच वडकतीपाडा जिल्हा परिषद शाळेमागील समुद्रकिनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा वाहून गेल्याने भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला असून, ग्रामस्थांच्या घरांसह रस्ते, शेती, पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि सार्वजनिक मालमत्ता धोक्यात आली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने मातीचा अथवा जिओ-बॅगचा तात्पुरता बंधारा उभारावा आणि त्यानंतर कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी चिखले ग्रामपंचायतीने केली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार निरंजन डावखरे यांना निवेदन देण्यात आले आहे.(फोटो सौजन्य – AI)
गेल्या २२ आणि २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नवी खाडी परिसरातील रस्ता पूर्णपणे वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासनाच्या निर्देशानुसार ठेकेदारांनी नरपड-आंबेवाडी तसेच नवी खाडी येथील सागरी मार्गावरील रस्ता अवघ्या ४८ तासांत पूर्ववत केला. मात्र, याच पुराच्या पाण्यामुळे समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा आणि वडकतीपाडा शाळेमागील समुद्रकिनाऱ्याचा मोठा भाग वाहून गेला.
बंधारा वाहून गेल्याने भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी गावाच्या दिशेने येत आहे. त्यामुळे नुकताच दुरुस्त करण्यात आलेला रस्ताही पुन्हा बाधित होण्याची शक्यता आहे. समुद्राचे खारे पाणी गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये तसेच भातशेतीत शिरल्यास मोठे नुकसान होण्याची भीती ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे. कायमस्वरूपी समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा उभारण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत मातीचा अथवा जिओ-बॅगचा तात्पुरता बंधारा उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिवृष्टी, समुद्राची भरती आणि मोठ्या लाटांमुळे धूप आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांसह तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चिखले ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजित काटेला, उपसरपंच मनोज राऊत यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले आहे. गावाची सुरक्षितता, शेती आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी समुद्रधूप प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.
Ans: समुद्राच्या लाटा, भरती-ओहोटी आणि वाऱ्यामुळे किनाऱ्यावरील माती व वाळू हळूहळू वाहून जाण्याच्या प्रक्रियेला समुद्रधूप म्हणतात.
Ans: नवीखाडी आणि वडकतीपाडा परिसरातील किनारा ढासळत असल्याने समुद्रधूपचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
Ans: किनारा मागे सरकल्याने घरे, रस्ते, शेती, वीज व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच स्थानिक पर्यावरणावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.