कुर्डुवाडी बसस्थानकात प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे; ना सुरक्षा रक्षक ना पोलीस
कुर्डुवाडी/ शिरीषकुमार महामुनी : कुर्डुवाडी बसस्थानकातील सुरक्षा रामभरोसे असून, याठिकाणी ना महामंडळाचा सुरक्षा रक्षक असतो, ना पोलिस त्यामुळे या स्थानकात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. स्थानकात नियमित सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याची मागणी जोर धरत आहे.
कुर्डुवाडी हे रेल्वेचे जंक्शन असल्यामुळे विदर्भ मराठवाड्यासह चारही दिशेने लोक रेल्वेने श्री क्षेत्र पंढरपुर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी बाराही महिने कुर्डुवाडी मार्गे येत असतात. काही रेल्वेने जाणे पसंत करतात, तर अनेकजण कुर्डुवाडी येथून पंढरपूरला राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसने जातात. त्यामुळे येथील बसस्थानकात कायम गर्दी असते. शिवाय विदर्भ, मराठवाड्याकडून पुण्याकडे, तर पुण्याकडून विदर्भ मराठवाड्याकडे, कोल्हापूर, सातारा, अक्कलकोट, सोलापुर नाशिक यासह अनेक एसटी बस या बसस्थानकातून येत-जात असतात.
कुर्डुवाडी बसस्थानकाचा परिसर खूप मोठा असून, स्थानकात येण्या-जाण्यासाठी असे दोन मार्ग आहेत. पण येण्याच्या मार्गावर अधिक राबता व कंट्रोलरुम हाॅटेल व मेडिकल व इतर दुकान गाळे आहेत. मात्र पाठीमागील बाहेर जाण्याच्या मार्गावर कोणीही नसते. रात्रीच्या वेळी याभागात फारसा उजेड नसून शुकशुकाट असतो. तो भयावह आहे. रात्रीच्यावेळी बसस्थानकात केवळ एक कंट्रोलर हा कर्तव्यावर असतो. कोणताही सुरक्षा रक्षक किंवा पोलिस वा होमगार्डसुद्धा नसतो. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून गाडीची वाट पाहात बसावे लागते. नुकतीच पुणे स्वारगेट येथे घडलेला प्रकार व दैनंदिन महिला सुरक्षेबाबत निर्माण होणारे नवनवीन प्रश्न विचारात घेऊन कुर्डुवाडी आगार व्यवस्थापकांनी परिवहन महामंडळाकडे स्वतंत्र सुरक्षा रक्षकाची मागणी करावी, बसस्थानकात रात्रीच्यावेळी नियमित पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
परिसरात भुरटे, गर्दुल्यांचा वावर
काही वेळा रात्री बेरात्री रेल्वेने प्रवासी बसस्थानकात येतात पण त्यांच्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी एसटी बस ही पहाटे किंवा सकाळच्या वेळेत असते. त्यामुळे त्यांना बस स्थानकातच आश्रय घेऊन बसावे लागते. रात्रीच्या वेळी बसस्थानकात अनेक भुरटे, गर्दुले हे देखील आश्रय घेऊन बसलेले असतात. बऱ्याचवेळा भांडण, हाणामाऱ्या, चोऱ्या होतात. अशावेळी बसस्थानकात केवळ एकच कंट्रोलर असतो. एकटा कंट्रोलर काय काय करणार? असा प्रश्न आहे.
कुर्डुवाडी बसस्थानकात प्रवास्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असून, याठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी विशेषतः रात्रीच्या वेळी राज्य परिवहन महामंडळाने सुरक्षा रक्षक नेमावा किंवा नियमित पोलिस संरक्षण घ्यावे.
-अविनाश गोरे, मंडल अध्यक्ष, कुर्डुवाडी भाजप
आम्ही वरिष्ठांकडे बसस्थानकात तीन शिफ्टसाठी प्रत्येकी दोन असे सहा सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे. पोलिस स्टेशनलाही सुरक्षा पुरविण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र त्यांनी त्याचा अद्याप विचार केलेला नाही.
-रत्नाकर लाड, कुर्डुवाडी आगार प्रमुख