नागपूर : महागाई काही केल्या (Inflation in Nagpur) थांबण्याचे नाव घेत नाही. खाण्या-पिण्याच्या वस्तूंसह पानंसुद्धा महागाईच्या विळख्यात सापडली आहे. बहुतांश लोक आजही पानाचे नियमित सेवन करतात, पूजन साहित्यातही याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पानाशिवाय पूजाविधीची कल्पनाही करता येत नाही. परंतु, पानालाही महागाईने आपल्या कवेत घेतले आहे. तसे पाहिल्यास पूर्वीच्या तुलनेत पान शौकीनांची संख्या कमी झाली आहे. सोबतच व्यापाऱ्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे.
आता शहरात पानाचे होलसेल 35 व्यापारी शिल्लक राहिले आहे. व्यापारही मंदावला आहे. पूर्वी शहरात दररोज 150 पेटाऱ्यांपर्यंत बंगला मिठा पानाची विक्री होत होती, ती आता 60 ते 70 पेटाऱ्यांवर आली आहे. नागपूर पान व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू दारव्हेकर यांनी सांगितले की, सध्या शहरात बंगला मीठा पान पश्चिम बंगालच्या छदामधून येत आहे. अनियमिततेमुळे कधी 10 पेटारे तर कधी 70 पेटाऱ्यांपर्यंत माल येतो. एका पेटाऱ्यात 3.000 पर्यंत पानं असतात. याचे दर 4,000 ते 15,000 रुपयांपर्यंत सुरू आहे. तर कपुरी पानाची आवक बुलडाणा, आंध्राच्या दुनी आणि विजयवाडा येथून होत आहे.
कपुरी पानाचे 700 ते 800 पेटारे दररोज येत आहे. याचे भाव 200 ते 1,200 रु प्रति पेटारा आहे. एका पेटाऱ्यात 2,500 पानं असतात. अपेक्षेनुसार मागणी होत नसल्याने मात्र व्यापाऱ्यांचा पैसा अडकत आहे. पुढे श्रावण महिन्यासोबतच सणोत्सवाला सुरूवात होत आहे. सणोत्सवादरम्य व्यवसायात वाढ होण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे.