दिव्यातील ज्या रस्त्याच्या लोकार्पण मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाले. त्या रस्त्याच्या खालच्या नव्या जलवाहिनीला व्हॉल्व्ह लावले नाहीत. आत्ता तो रस्ता पुन्हा खाेदला जात आहे. या रस्त्यावर खर्च झालेले ६६ कोटी रुपये हे कोणाच्या घरातील नाहीत. जनतेने घाम गाळून कमाविलेले आहेत. याची जाणीव आपल्याला असेलच या आशयाचे ट्वीट मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. इतकेच नाही तर आपण ४ लाख नागरीकांसाठी एकदा तटस्थपणे आढावा घ्या. दिव्यातला अंधार दिसेल असेही राजू पाटील यांनी म्हटले आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. शनिवार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कल्याणमध्ये लोकग्राम पादचारी पूलाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावर मनसे आमदार पाटील यांनी ट्वीटद्वारे टिका केली. आत्ता मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत मनसे आमदार पाटील यांनी ट्विट द्वारे टिका केली आहे.
काय आहे ट्वीट
मा.मुख्यमंत्री साहेब,७ जूनला दिवा येथील जो रस्ता आपल्या हस्ते जनतेसाठी खुला झाला, त्याच रस्त्याखालच्या नवीन जलवाहिनीला व्हॉल्व्ह लावले नाहीत म्हणून आता तो पुन्हा खोदला जात आहे. या रस्त्यावर खर्च झालेले ६६कोटी रुपये हे कोणाच्या घरचे नाहीत तर जनतेने घाम गाळून कमावलेले आहेत याची जाणीव आपणांसही असेलच. आपण लोकार्पण केलेल्या दिवा आगासन रस्ता व नवीन जलवाहिनीची कामं अजून पूर्णच झाली नाहीत. आपणांस दिव्यातील तुमचे माजी नगरसेवक व पदाधिकारी अंधारात ठेवत आहेत, यावर आम्ही काहीही केले तरी आपल्या समर्थकांना व आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीला त्यात राजकारण दिसते. म्हणून माझी आपणांस विनंती आहे की दिवा विभागात राहणाऱ्या सुमारे ४ लाख नागरीकांसाठी एकदा तटस्थपणे आढावा घ्या, आपणांस दिव्यातला अंधार दिसेल.
यासंदर्भात ठाणे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी सांगितले की, या कामात काही प्रशासकीय चूक झाली असेल तर मुख्यमंत्र्यांना दोष देणे कितपत योग्य आहे ? आणि काही चूक झाली असेल तर ते काम ठेकेदाराकडून करून घेतले जाईल दिव्यात प्रकाश आहे परंतु टीका करणाऱ्याचा डोक्यात अंधार आहे असा प्रतिउत्तर दिला आहे