संग्रहित फोटो
लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या वलांडी गटातील उमेदवार उषा संभाजी पाटील (तळेगावकर) यांची अध्यक्षपदी तर जानवळ गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दयानंद दामोदर सुरवसे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उषा पाटील यांना 34 मते, तर काँग्रेसच्या दीपाली शामराव भोसले यांना 25 मते मिळाली. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदासाठी दयानंद सुरवसे यांना 34 मते, तर काँग्रेसच्या नागेश्वरी सचिन केंद्रे यांना 25 मते मिळाली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर पटकावला सरळ विजय
भाजपाच्या वतीने अध्यक्षपदासाठी उषा पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने उपाध्यक्षपदासाठी दयानंद सुरवसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कॉंग्रेसच्या वतीने अध्यक्षपदासाठी लांबोटा गटाच्या मानसी प्रमोद मरुरे, मातोळा गटाच्या दीपाली शाम भोसले आणि आर्वी गटाच्या राजश्री धनंजय देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या नागेश्वरी सचिन केंद्रे, मुकेश भालेराव आणि अश्विनी दत्तात्रय शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यानंतर मानसी मरुरे व राजश्री देशमुख यांनी अध्यक्षपदाचे तर मुकेश भालेराव व अश्विनी शिंदे यांनी उपाध्यक्ष पदाचे अर्ज मागे घेतल्याने सरळ लढत झाली. अखेरीस मतदान प्रक्रियेत भाजप-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विजयी झाले. उषा पाटील या माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समर्थक मानल्या जातात, तर राष्ट्रवादीचे दयानंद सुरवसे हे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गटातील मानले जातात.
हे सुद्धा वाचा : थकबाकीदारांसाठी अभय योजना ठरतेय फायद्याची; महापालिकेच्या तिजोरीत 954.78 कोटी जमा
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सह्यांचे राजकारण
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांकडून लॉबिंगचे राजकारण रंगू लागले आहे. पक्षाने उमेदवार निवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवले असतानाही काही इच्छुकांकडून सदस्यांच्या सह्या गोळा करून शिफारस व पाठिंब्याची पत्रे तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ५१ सदस्य असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर पक्षाचीच निवड होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या निर्णयानुसारच अधिकृत उमेदवारांची घोषणा होणार आहे.






