Shinde group is upset with BJP leader Ganesh Naik's statement
नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधी अशी वाद विवाद सुरु आहेत. नवी मुंबईमध्ये शिंदे गट विरुद्ध भाजप अशी थेट लढत सुरु असल्याचे दिसून आले आहे. भाजपाने गणेश नाईक यांना नवी मुंबईच्या ऐरोली विधानसभेतून उमेदवारी दिली असली तरी शिवसेना शिंदे गटाने मात्र उमेदवारीला विरोध केला आहे. गणेश नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. माझे सर्व विरोधक स्वर्गस्थ झाले, असे म्हणत गणेश नाईक यांनी शिंदे गटाला डिवचले. त्यांच्या या वक्तव्यावरुन नवीन वाद सुरु झाला आहे.
भाजपाचे नेते व उमेदवार गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मागच्या वेळेला मी गाफील होतो. 1999 ला मला फसवून हरवलं गेलं, हे सर्वांना माहीत आहे. पहिल्या फेरीत मला 7500 मतांचे लीड मिळाले होते. माझ्या विरोधात कट रचणारे सर्व लोक स्वर्गस्थ झाले, एकही जिवंत उरला नाही. मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नसतं. परमेश्वराला सांगतो की, त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळण्यासाठी तुझ्याबरोबर त्यांना ठेव”, असे विधान यांनी माध्यमांशी बोलताना केले.
हे देखील वाचा : महायुतीचं सरकार येणार, काळ्या दगडावरची रेघ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
गणेश नाईक यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये जोरदार टीका आणि चर्चा होत आहे. त्यांच्या या विधानावर नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विजय चौगुले यांनी म्हटले की, गणेश नाईक यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल हे विधान केले गेले आहेत. तसेच वसंत डावखरे यांचाही उल्लेख गणेश नाईकांच्या त्या विधानात आहे. आनंद दिघे साहेबांचे फोटो लावून आम्ही मत मागतो. आनंद दिघे हे आमच्यासाठी दैवसारखे आहेत. जर गणेश नाईक यांना इतका माज आला असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही ऐरोलीमधील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याशेजारी जाहीर निषेध आंदोलन करू, असे मत शिंदे गटातील नेत्यांकडून व्यक्त केले जात आहेत.
हे देखील वाचा : धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली…; अमित ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत