10 वर्षानंतरही ठाकरे बालनाट्यगृहाचे काम अर्धवटच; खर्च 2 कोटींवरून 29 कोटींपर्यंत वाढला
पुणे/प्रगती करंबेळकर : कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या शेजारी उभारले जात असलेले कै. बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह तब्बल ११ वर्षे झाली तरीही पूर्णत्वास गेलेले नाही. नाट्यप्रेमी, कलाकार आणि नागरिकांनी मोठ्या आशेने पाहिलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खर्च सुरुवातीच्या अंदाजित २ कोटी रुपयांवरून तब्बल २९ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. मात्र इतका खर्च झाल्यानंतरही अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण अवस्थेतच आहेत.
पुणे शहरात नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहांची कायम टंचाई जाणवत असताना, पुणे महापालिकेने २०१५ मध्ये कोथरूडमध्ये ३८५ आसनक्षमतेचे बालनाट्यगृह व कै. बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्यास सुरुवात केली. या प्रकल्पात वाहनतळ, पोडियम, कार्यालय आदींसह नाट्यगृह उभारण्याची योजना होती. मात्र १० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही नाट्यगृहाच्या अनेक कामांचा गाडा रेंगाळलेलाच आहे. महापालिकेकडून डिसेंबर २०२५ पर्यंत उर्वरित कामे पूर्ण होतील, असा दावा केला जात असला तरी कामाच्या गतीबाबत शंका व्यक्त होत आहेत.
सध्या प्रलंबित असलेल्या कामांमध्ये मुख्य रंगमंचावर पडदा बसविणे, कलाकारांच्या खोलीतील फर्निचर आणि विद्युत कामे, पहिल्या मजल्यावरील लिफ्ट बसविणे, पोडीयमवर पॅनल्स व म्युरल्स लावणे, इमारतीचे अंतिम रंगकाम, ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळील विद्युत कामे आणि कलादालनाचे अंतर्गत कामे यांचा समावेश आहे. याशिवाय नाट्यगृहाच्या वाहनतळाची स्थितीही अत्यंत दयनीय आहे. वाहनतळात जागोजागी राडारोडा पडलेला असून पाण्याचे तळे साचले आहेत. मद्यपींच्या वावरामुळे तेथे दारूच्या बाटल्या विखुरलेल्या दिसतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर धूळ साचलेली आहे, कचरा पसरलेला आहे, ज्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही प्रश्न निर्माण होत आहेत.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नूतनीकरणाची गरज
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचीही स्थिती दिवसेंदिवस खराब होत असून, ते लवकरच दुरुस्तीसाठी दोन महिन्यांसाठी बंद ठेवले जाणार आहे. त्या काळात जर ठाकरे बालनाट्यगृह कार्यान्वित झाले, तर नाट्यप्रयोग तिथे हलवता येतील आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळेल, अशी कलाकारांची अपेक्षा आहे.
ठाकरे नाट्यगृहाचे काम २०१५ पासून सुरु आहे. ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून काही दिवसांपूर्वी मी अतिरिक्त आयुक्तांशी संवाद साधला. हे नाट्यगृह सुरू होणे आणि सुव्यवस्थित चालणे आवश्यक आहे. शहरातील हे पहिले ठिकाण आहे जिथे एकाच ठिकाणी दोन नाट्यगृह आहेत. यामुळे पुढे जाऊन नाट्यसृष्टीला मोठा फायदा होईल आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा भारही कमी होईल. नाट्यप्रेमी आणि नागरिक मात्र या कामाची वेगाने पूर्तता व्हावी, अशीच अपेक्षा बाळगून आहेत.
– सुनिल महाजन, अध्यक्ष नाट्यपरिषद कोथरूड