नाताळनिमित्त पुण्यातील 'या' भागात वाहतूकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
पुणे : लष्कर परिसरात नाताळच्या निमित्ताने बुधवारी (२५ डिसेंबर) वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. संभाव्य गर्दी विचारात घेऊन या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. गर्दी वाढल्यानंतर महात्मा गांधी रस्ता (एम. जी. रोड) वाहतुकीस बंद करण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
नाताळानिमित्त लष्कर भागासह शहरातील विविध भागात तसेच उपनगरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मध्यरात्रीपर्यंत मोठी गर्दी काही भागांमध्ये असते. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यास वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. तसेच, महात्मा गांधी रस्त्यावर गर्दी वाढल्यास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी सायंकाळी ७ पासून बदल करण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत या भागात वाहतूक बदल लागू राहणार आहेत. वाय जंक्शन येथून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कुरेशी मशीद, सुजाता मस्तानी चौकातून वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून अरोरा टॉवर्सकडे येणारी वाहतूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून तीन तोफा चौकाकडे सोडण्यात येणार आहे.
व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. इंदिरा गांधी चौकातून वाहने लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहने ताबुत स्ट्रीटमार्गे जातील, असे वाहतूक शाखेकडून कळविण्यात आले आहे.
ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण
आपल्या भारत देशामध्ये विविध जाती आणि धर्माचे लोक एकजुटीने राहतात, त्यामुळे भारताला सर्वधर्म समभाव असलेला देश म्हणून संबोधले जाते. प्रत्येक धर्मातील सण, उत्सव, संस्कृती, परंपरा वेगवेगळ्या असतात. ‘विविधतेत एकता असणार्या आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्माचे लोक आपापले सण मोठ्या उत्सहाने साजरा करतात आणि देशभरातील लोक हे हे सणही मोठ्या उत्साहात व एकोप्याने साजरे करतात. ‘नाताळ’ म्हणजेच ‘क्रिस्टमस’ हा त्या सणांपैकी ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण.