सौजन्य - नवराष्ट्र टीम
कोल्हापूर : गोवा, कर्नाटक आणि कोल्हापूरसह सांगलीला एमडी ड्रग्जची तस्करी करणार्या रॅकेटचा शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी पर्दाफाश केला आहे. सांगलीतील एका हॉटेल व्यावसायिकाच्या पुत्रासह साथीदाराला बेड्या ठोकून त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचा २९ ग्रॅम अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. अथर्व संजय सरवदे (वय २४, रा. रतननगर रोड नं. १२, विश्रामबाग, सांगली) व संतोष काशीनाथ पुकळे (वय ३०, लक्ष्मीनगर, जुना कुपवाड रोड, शिवमंगल अपार्टमेंट प्लॉट नं. १, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.
शाहू मार्केट यार्डातील वाळू अड्डा परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. न्यायालयाने दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. संशयित सरवदे याने अमली पदार्थांचा साठा शुक्रवारी रात्री उशिरा गोव्यातून कोल्हापुरात आणला होता. संतोष पुकळे याच्यामार्फत या साठ्याची मार्केट यार्ड येथील वाळू अड्डा परिसरातून सांगलीकडे तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने रात्री उशिरा सापळा रचून संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
संशयितांचे गोवा व कर्नाटक कनेक्शन
संशयितांनी पोलिसांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने दोघांची अंगझडती घेताच अमली पदार्थाची दोन पाकिटे त्यांच्याकडे आढळली. चौकशीअंती जप्त साठा एमडी ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने चौकशीची व्याप्ती वाढविली. संशयितांचे गोवा व कर्नाटक कनेक्शन प्राथमिक चौकशीत समाेर आले आहे. साठा गोव्यातून कोणाकडून उपलब्ध झाला, याची माहिती घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
हे सुद्धा वाचा : मुलींचा घसरता जन्मदर चिंता वाढवणारा; केंद्रीय अहवालातून धक्कादायक वास्तव समाेर
कोल्हापूरसह सांगलीतील साथीदारांचा सहभाग
अमली पदार्थ तस्करीत अथर्व सरवदे याच्या कोल्हापूरसह सांगलीतील साथीदारांचा सहभाग असावा, असा संशय आहे. सरवदे हा सांगली (विश्रामबाग) येथील हॉटेल व्यावसायिकाचा पुत्र असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास शाहूपुरीचे तपास पथक सांगलीला जाणार असल्याचे ते म्हणाले.
अमली पदार्थांची तस्करी वाढली
देशात आता अमली पदार्थांचा साठा असो वा त्याची तस्करी हे सर्व वाढल्याचे दिसत आहे. त्यात काही महिन्यांपूर्वी पुण्यात ड्रग्ज तस्करी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच राजस्थानात मोठा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला होता. मध्य प्रदेशात मोठी कारवाई करण्यात आली होती. राजधानी भोपाळमध्ये तब्बल 1800 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.