
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, ग्रामस्थ संतप्त; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना
रोहित बाबू कापरे (वय ८, रा.धामणसई, ता. रोहा जि.रायगड), असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर, “जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत मृतदेह दवाखान्यातून हलवणार नाही,” अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे.
पारगाव येथे श्रीराम भिकाजी भोर यांच्या शेतात कांदा काढणीसाठी आलेल्या मजुरांचा मुलगा रोहित कापरे हा शेताच्या बांधावर बसला होता. याचवेळी परिसरातील ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संधी साधून रोहितवर हल्ला केला. त्याला ऊसाच्या शेतात ओढत नेले. यावेळी महिला मजुरांनी ऊसाच्या शेतात शिरून बिबट्याच्या तावडीतून सोडवून पारगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले परंतु या हल्ल्यात रोहित हा गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना चिंताजनक आहे, पिंपरखेड येथे काही दिवसांपूर्वी रोहन बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पारगाव मंगरूळ येथील आजची घटना पिंपरखेडच्या या पूर्वीच्या घटनास्थळापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर घडली आहे. रोहित कापरे याचा झालेला मृत्यू हा पारगावच्या हद्दीत नोंदवला गेला असला तरी, पिंपरखेडजवळील या भागात बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना ठरली आहे.
परिसरात पिंजरे लावण्याची मागणी
जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे दर्शन आणि मानवी वस्तीवरील हल्ले वाढत असल्याने वनविभाग आणि स्थानिक प्रशासनावर नागरिकांचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी आली आहे. बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची आणि परिसरात पिंजरे लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.