
महायुतीमध्ये एकमत नाहीच; पुण्यात शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार
पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेची युती होणार नाही अशी माहिती आहे. शिंदेंची शिवसेना पुण्यात स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे. भाजपने फक्त १६ जागा देऊ केल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शिवसेना नेते नाना भानगिरे यांनी सांगितलं आहे. जागावाटपाच्या निर्णयाबाबत आज पुण्यात शिवसेनेची बैठक पार पडणार होती, या बैठकीसाठी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत पुण्यात येणार होते, मात्र उदय सामंत पुण्यात येण्याअगोदरच शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी पुण्यात कार्यकर्त्यांची बाजू घेतली.
शिवसेनेने 165 जागा लढणार असल्याचं सांगितलं आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याचं सांगत युतीत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. एबी फॉर्म देण्यासाठी शहराध्यक्ष आणि उपनेते हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. पुण्यात शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर झालं आहे. शिवसेना १६५ जागा लढवणार आहे, सर्वांना एबी फॉर्म दिले जातील, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत असलेला वाद अधुन मधुन समाेर येत हाेता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहीला असताना, महायुतीत समाविष्ट असलेल्या शिंदेंची शिवसेना आणि आरपीआय यांच्यातच जागा वाटपाचे सुत्र जमले नाही. भाजप आणि माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. जागा वाटपाचे चित्र स्पष्ट न झाल्याने आरपीआयच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमाेरच आंदाेलन केले.